सोलापूर : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते पाटील यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील लॅबला पाठविले होते. रविवारी त्याचा अहवाल दाखल झाला असून दोघांचाही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती माळशिरस पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर मुंबई येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हजेरी लावली होती, त्यानंतर त्यांना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी चौदा दिवस क्वारंटाईन राहून शासनाच्या नियमांचे पालन केले होते.
त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील काही गावांना भेटी दिल्या होत्या, शिवाय कोरोना संदर्भात आरोग्य विभागाकडून आढावा घेतला होता. अशातच त्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती, मात्र मुंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील सर्व लोकांना आरोग्य विभागाने होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार पुन्हा रणजितसिंह मोहिते-पाटील पुन्हा होम क्वारंटाईन झाले. त्याचवेळी आरोग्य विभागाने कोरोना तपासणीसाठी त्यांचे व त्यांच्या पत्नीचे स्वॅब घेतले होते त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. त्यात दोन्हीही अहवाल निगेटिव्ह आढळून आले.