सोलापूर : ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला असून ते या निर्णयावर ठाम आहेत. फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी ते ८ ऑगस्ट रोजी अमेरिकेत जाणार आहेत. त्याचवेळी ते आपली भूमिका मांडतील.
शाळेमध्ये ३४ महिने गैरहजर असल्याप्रकरणी डिसले यांच्याकडून १७ लाख रुपयाचे वेतन परत घेणार असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले. तर गैरहजरीबाबत प्रशासनाला आवश्यक ती कागदपत्रे दिली आहेत. राजीनामा देण्याचा निर्णय हा विचाराअंती घेतला आहे. त्यामुळे माघारी घेण्याचा प्रश्नच नाही, असे डिसले गुरुजींनी सांगितले.
शहानिशा करून निर्णय घेणार - सीईओडिसले यांच्या राजीनाम्यावर लगेच निर्णय घेता येणार नाही. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करण्यात येणार आहे. त्यांनी राजीनामा का दिला, हेदेखील पाहणार आहोत. त्यांच्या विषयीचा अहवाल पाहून, वरिष्ठांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याचे जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
मी अचानक राजीनामा दिलेला नसून पूर्ण विचार करूनच दिला आहे. ऑगस्ट महिन्यात फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी मी अमेरिकेत जाणार आहे. त्यावेळी मी माझी भूमिका परिषदेतून मांडेन. - रणजितसिंह डिसले गुरुजी.