सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षातील राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, रणजितसिंह मोहिते - पाटील आणि कालिदास कोळंबकर हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मंत्रीमंडळातील प्रवेश नक्की मानला जात आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणूकीपुर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता़ त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर याच्या प्रचारार्र्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकलूज शहरात पार पडली़ या सभेला विराट जनसमुदाय गोळा करून मोहिते-पाटील परिवाराने मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर लोकसभा प्रचारात अकलूजमधून १ लाख मताचा लीड रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना मिळवून देऊ असेही मोहिते-पाटील परिवाराने सांगितले होते त्यानुसार एक लाखांच्या वर लीड मोहिते-पाटील यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करण्यातही मोहिते-पाटील परिवाराने कुठेही कसर ठेवली नाही. या एकूणच कामगिरीवरून रणजितसिंह मोहिते-पाटीलांची मंत्रीमंडळातील वर्णी १०० टक्के खरी मानली जात आहे.
भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सहा जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चाही आहे तर शिवसेनेची एकाच वाढीव मंत्रिपदावर बोळवण होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सहा आणि शिवसेनेचा एक मंत्री शपथ घेणार आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याचं म्हटलं जातं.
विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सर्वांना लवकरच खुशखबर मिळेल. शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेनुसार मंत्रिपदं मिळतील, असं मुनगंटीवार म्हणाले.