सोलापूर/मुंबई - ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्या नावाची आता शिक्षणक्षेत्राला ओळख करुन द्यायची गरज नाही. जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींनी जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळवून जगात महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. त्यामुळे, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून शिक्षणक्षेत्रात त्यांचं योगदान घेण्यात येत आहे. तर, मानद पद देत अनेक संस्थांकडून त्यांचा गौरवही होत आहे. आता, डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे, ते आता शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर बनले आहेत.
डिसले गुरुजींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत मानद डॉक्टरेट मिळाल्याची माहिती दिली. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे, या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल मी आयटीएम विद्यापीठाचे आभार मानतो. तसेच, हा आनंद शब्दात व्यक्त करण्यापलिकडचा आहे, असेही डिसले गुरुजींनी पदवी स्विकारल्यानंतर म्हटले आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामातही झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे. जगभरातील 12 व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये बार्शीच्या डिसले गुरुजींचा समावेश आहे.
ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमीवरही निवड
सन २०१८ मध्ये राज्य शासनाच्या स्टार्टअप धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरता महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत राज्यातील सर्व घटकांकरता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबंधित विवीध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबवले जातात. यापूर्वी वार्के फाऊंडेशनने एक पुरस्कार सुरू असून, हॉलिवूडमधील अभिनेते अॅश्टन कुचर व मिला कुनिस यांच्यासह रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे.
कौशल्य विकास विभागाचे सदिच्छा दूत
रणजितसिंह डिसले गुरुजींची राज्याच्या कौशल्य विकास विभागात 'सदिच्छा दूत' म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ही नेमणूक करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी हाती घेतलेले उपक्रम नव उद्योजकांना प्रेरणादायी करणारे ठरतील, म्हणूनच हे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत या हेतूने रणजितसिंह डिसले यांची सदिच्छा दूत म्हणून निवड केली आहे.