राकेश कदम, साेलापूर: भाजपने लाेकसभा, विधानसभा निवडणूक आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने बुथ सक्षमीकरणाचे काम हाती घेतले आहे. साेलापूर ग्रामीणची जबाबदारी आमदार रणजितसिंह माेहिते-पाटील यांच्यावर साेपविण्यात आली आहे. भाजप गेल्या सहा महिन्यांपासून बुथ सक्षमीकरणावर काम करीत आहे. बुथ सशक्तीकरणासाेबतच धन्यवाद माेदीजी, मन कि बात असे अनेक कार्यक्रम सुरू आहेत. साेलापूर शहरातील बुथ यंत्रणेची जबाबदारी शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे आहे. ग्रामीण भागातील काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून सुरू हाेते.
यादरम्यान, भाजपच्या विधान परिषदेच्या आमदारांना पक्ष संघटनेच्या कामात गुंतविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रणजितसिंह माेहिते-पाटील यांच्यावर साेलापूर ग्रामीण भागातील बुथ सशक्तीकरणाचे काम साेपविण्यात आले आहे. माेहिते-पाटील यांना लाेकसभा, विधानसभा, विधान परिषदेच्या निवडणुकांचा अनुभव आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये यंत्रणा लावण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. यामुळेच रणजितसिंहांवर ही जबाबदारी साेपविण्यात आल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लाेकमत’ला सांगितले. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत शक्ती केंद्रप्रमुख व बुथ प्रमुख यांच्याशी संपर्क करावा. सर्वांना साेबत घेऊन हे काम पूर्ण आणि प्रदेश कार्यकारिणीला अहवाल पाठवा, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
काय आहे पक्षाचा प्लॅन?
बूथ सशक्तीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप एका बुथमध्ये प्रत्येकी २० मतांमागे एक कार्यकर्ता देण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक बुथवर १०० कार्यकर्त्यांची नाेंदणी व्हावी असे सांगण्यात आले आहे. साेलापूर लाेकसभा क्षेत्रातील एका विधानसभा मतदारसंघात ६० हजार याप्रमाणे साडेतीन लाख बुथ कार्यकर्त्यांची नाेंदणी करण्याचे टार्गेट माेहिते-पाटील यांना दिले आहे.