बार्शी : महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी अपेक्षेपणे भाजपाचे रणवीर राजेंद्र राऊत तर उपाध्यक्षपदी झुंबर जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला आहे. या निवडीवेळी विरोधी राष्ट्रवादीचे सर्व संचालक गैरहजर राहिले़ निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून गुलालाची उधळण केली.
बाजार समितीच्या १८ जागांपैकी भाजपाच्या राजेंद्र राऊत यांच्या नऊ, राजेंद्र मिरगणे यांच्या दोन तर राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल यांच्या सात जागा आल्या. दोन दिवसांपूर्वी भाजपाचेच राजेंद्र मिरगणे यांनी राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला होता. आज दुपारी सहलीवर गेलेले सर्व ११ संचालक बाजार समितीत दाखल झाले. सभापती व उपसभापतीसाठी एकेकच अर्ज दाखल केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, सहायक निबंधक अभय कटके, संचालक रावसाहेब मनगिरे, शालन गोडसे, महादेव चोरघडे, काशिनाथ शेळके, सचिन जगझाप, वासुदेव गायकवाड, बुवासाहेब घोडके, साहेबराव देशमुख, कुणाल घोलप यांच्यासह भाजपा नेते माजी आ. राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, संतोष निंबाळकर, अनिल डिसले, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, उपसभापती अविनाश मांजरे, अॅड. जीवनदत्त आरगडे, कुंडलिकराव गायकवाड, विजय राऊत, भाजपाचे तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, केशव घोगरे, सुभाष लोढा, गटनेते दीपक राऊत, जि. प. सदस्य किरण मोरे, समाधान डोईफोडे उपस्थित होते.
मी, मिरगणे एकत्र यावे ही भगवंताची इच्छा : राजेंद्र राऊत- बाजार समिती आमच्या ताब्यात असावी, ही चंद्रकांत निंबाळकर यांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. मी व मिरगणे एकत्र यावे, अशीदेखील भगवंताची इच्छा असावी म्हणून आम्हाला नऊ जागा मिळाल्या आणि राजेंद्र मिरगणे आमच्या सोबत आले. विरोधकांनी बाजार समितीला राजकीय अड्डा बनविला होता. बाजार समिती शेतकºयांचे मंदिर असून आजपासून ते भक्तांसाठी खुले झाले आहे. या पुढील काळात बाजार समितीचा नावलौकिक कायम ठेवू. मिरगणे यांनी प्रशासकीय काळात चांगले काम करून बाजार समितीचे उत्पन्न वाढविले आहे. लवकरच बाजार समितीमधील विरोधकांचा आणखीन एक घोटाळा बाहेर पडेल, असे सांगत शेतकºयांच्या रुपया-रुपयाचा हिशोब घेऊ, असे माजी आ. राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
पणन मंडळाकडून निधी आणू: मिरगणे - बाजार समितीमध्ये नवीन पहाट उगवली आहे. माझ्या काळात शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबविण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीचे उत्पन्न वाढविले. विकासासाठी पणन मंडळाकडून निधी आणण्याची जबाबदारी माझी असल्याचे राजेंद्र मिरगणे यांनी सांगितले.
माजी आ. राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, विश्वास बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी देण्यात आली. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बाजार समितीचा कारभार केला जाईल़ -रणवीर राऊत,सभापती, बाजार समिती, बार्शी