- अविनाश कोळीसांगली - सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सूतगिरणी ते यशवंतनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना रोडरोलर चालकाला चक्कर आली अन् तो स्टिअरिंगवरच कोसळला. त्यानंतर रोलर चौकातील एका महा ई सेवा केंद्राच्या दिशेने जाऊ लागला. चौकात नागरिकही थांबले होते. त्यामुळे साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला; पण एका तरुणाने धाडस दाखवत चालत्या रोलरवर चढून रोलर बंद केल्याने जीवितहानी टळली.
सूतगिरणी चौकात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दररोज सायंकाळी या चौकात नागरिकांची वर्दळ असते. शनिवारी चौकात नेहमीप्रमाणे गर्दी होती. रोड रोलरने रस्त्याचे काम सुरू होते. अचानक चालकाला चक्कर आली आणि ताे स्टिअरिंगवर कोसळला. रोलर दिशाहीन होऊन चौकातून पुढे जाऊ लागला. एका महा ई सेवा केंद्राच्या दिशेने येत होता. चौकातील नागरिकांना रोलरबाबत शंका आली. त्यांनी निरखून पाहिल्यानंतर चालक कोसळल्याचे लक्षात आले. मात्र रोलर थांबविणार कसा, असा प्रश्न साऱ्यांना पडला. रोलर आता दुकानांमध्ये घुसणार असे वाटत होते. अनेकांची घाबरगुंडी उडाली. काहींजण गाफीलपणे थांबले होते. मोठी दुर्घटना अवघ्या काही क्षणांत घडणार होती. इतक्यात लखन पेटीकर नावाचा तरुण धाडसाने रोलरवर चढला. त्याने किल्ली बंद करून ब्रेक दाबल्याने तो रोलर एका ई सेवा केंद्राच्या दारात जाऊन थांबला.
येथील कामाचा ठेका आर. एन. पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्याकडील चालकाला चक्कर आली. चालकाची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तरुणाचे कौतुकज्या तरुणाने तत्परता दाखवत रोलर थांबविला, त्या लखनचे साऱ्या नागरिकांनी कौतुक केले. रोलर थांबविल्यानंतर बेशुद्धावस्थेतील चालकास खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्यास दवाखान्यात नेण्यात आले.