माढा : माढा शहराच्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ येथील प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनल साठे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तहसील कार्यालयावर मंगळवारी घागर मोर्चा काढला. यामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. कूर्मदास कारखान्यापासून या मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन घोषणा देत व हातात घागरी घेऊन मोर्चा तहसील कार्यालयावर आला. शहराची लोकसंख्या १५ हजारांच्यावर आहे. नळ पाणीपुरवठा योजना अयोग्य व चुकीच्या नियोजनामुळे शहराची पाण्याची गरज भागवू शकत नाही. दहा ते बारा दिवसांनंतर पाणी सोडले जाते, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रमेश शेंडगे यांना देण्यात आले. यानंतर माढा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सज्जन जाधव यांना शुद्ध व आवश्यक त्या उपाय, सुधारणा करुन नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार शेंडगे यांनी दिल्या. या मोर्चात गीतांजली देशमुख, कामिनी गवळी, अपर्णा मेहता, अनुराधा गोटे, वंदना लंकेश्वर, रेणुका माळी, आशा काटे, रेखा चवरे, संगीता साठे, मालन साठे, कविता साठे, शांता साठे, विमल कानडे, राधा देवकर, सुजाता राऊत, सुजाता खरात आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
-----------------------
माढ्याच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात आमदार बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत पाच मे रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता साळी, सभापती रणजितसिंह शिंदे, उपसरपंच राजेंद्र चवरे यांची बैठक झाली. यावेळी येवती तलावा वरील भारनियमन दोन टप्प्यावरुन एका टप्प्यात करण्याचा निर्णय झाला. पाच ते १२ या वेळेत भारनियमन ठेवण्यात आले. दुपारी १२ ते पहाटे पाच या वेळेत वीज चालू ठेवली, यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील. -झुंजार भांगे, जि. प. सदस्य