चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात अनेक दिवसांपासून दुर्मिळ पक्ष्यांसह परदेशी पक्ष्यांचे वास्तव्य वाढते आहे. हे धरण पक्ष्यांचे माहेरघर ठरते आहे.
अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील कुरनूर धरण परिसरासह चपळगाव, बावकरवाडी, सिंदखेड, कुरनूर, बºहाणपूर, डोंबरजवळगे, हन्नूर, दहिटणे, मोट्याळ, चुंगी, चपळगाववाडी, तीर्थ, हालहळ्ळी(अ) यांसह अनेक गावांच्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती या दुर्मिळ पक्ष्यांना पोषक ठरत असल्याने येथे हे पक्षी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करीत असल्याचे नेचर कॉन्झर्व्हेशनचे शिवानंद हिरेमठ यांनी सांगितले.
हरणा आणि बोरी नदीच्या संगमावर बांधलेल्या कुरनूर धरणात काही ठिकाणी बेटासारखी जमीन आहे. येथे मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. तसेच जुन्या बावकरवाडीतील पडकी घरे या पक्ष्यांसाठी लाखमोलाचे ठरत असल्याने दुर्मिळ पक्ष्यांसह नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले काही पक्षीदेखील येथे वास्तव्यास असल्याचे आढळले आहे. धरण परिसरातील शेतातील मिळणारे अन्न, बेटांसारख्या भागावरील झाडी-झुडपांवर निवाºयाची व्यवस्था तसेच पडक्या घरांमुळे निर्मनुष्य वस्तीत मिळणारी सुरक्षितता या पोषक वातावरणामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पक्षी येत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या एकूण २७४ जाती आढळतात अशी नोंद आहे. नेचर कॉन्झर्वेशनच्या सर्वेक्षणानुसार छायाचित्र व व्हिडीओजच्या नोंदीतून २३५ जातीचेच पक्षी असल्याचे निदर्शनास येते. या पठारी प्रदेशातील पोषक स्थिती दुर्मिळ पशुपक्ष्यांना वास करण्यास भाग पाडते, यामुळे येथे काही वर्षांपूर्वी दिल्लीतील पर्यावरण संरक्षण विभागाचे संचालक हबीब बिलाल (काश्मिर) व सध्या अमेरिकेत पशू पक्ष्यांविषयी पीएच.डी.करीत असलेल्या दिल्लीच्या गीता अग्रवाल यांनी कित्येक दिवस अभ्यासदेखील केला आहे.
उजनी धरणांसह इतर जलसाठ्यांच्या तुलनेत कुरनूर धरणाची भौतिक व भौगोलिक परिस्थिती आगळीवेगळी ठरत असल्याने परदेशी, दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पक्षी येथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करीत आहेत. यामुळे भविष्यात या दुर्मिळ पक्ष्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी, तसेच नामशेष होत चाललेल्या पक्ष्यांच्या जाती जतन करण्यासाठी कुरनूर धरणावर पक्षी निरीक्षण केंद्र उभारल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. सध्यपरिस्थितीत एनसीसीएसचे (नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर) प्रमुख भरत छेडा यांच्या नेतृत्वाखाली चपळगावचे शिवानंद हिरेमठ,सचिन पाटील,महादेव डोंगरे व रत्नाकर हिरेमठ यांनी अनेक वर्षांपासून या परिसरात याविषयी अभ्यास सुरू ठेवला आहे.
कुरनूर धरणावरील पक्षी....
- - हरियाल (महाराष्ट्र राज्यपक्षी)
- - फ्लेमिंगो(रोहित)
- - युरेशियन कर्लिव्ह(युरेशियन कुरव, हा पक्षी विशेषत: उत्तर आशियातच आढळतो, परंतु तेथून स्थलांतरित होऊन कुरनूर धरणावर पोहोचला हा पक्षी)
- - एशियन पाईड स्टर्लिंग(रंगीत मैना-आपल्या येथील मैना पक्ष्यापेक्षा वेगळ्या स्वरूपातील पक्षी)
- - बार हेडेड गुज (पट्टकादंब- हिमालय पर्वताएवढ्या उंचीइतक्या वरून उडणारा हा पक्षी)
- - आॅ स्प्रे(कैकर)
- - रोज फिंच(गुलाबी चटक)
- - पेरीग्रीन फाल्कन(बहिरी ससाणा)
- - ब्ल्यू थ्रोट(शंकर)
- ४ब्लॅक नेप्ड मोनॉर्च(नीलमणी)
- - इसाबिलीन व्हिटर(मातकट रणगोजा-शेपूट टोक काळा, पंख व खांदा काळा इतर भाग फिकट तपकिरी असलेला हा पक्षी धरण परिसरातील माळरानावर हिवाळी पाहुणा म्हणून दिसला आहे.)
या भागात विशेष पक्षी
- - टेरेक शॅड पाईपर (उलट चोच तुतारी-विशेषत: समुद्रकिनारी आढळणारा हा पक्षी. स्थलांतरित पक्षी थोडे दिवस राहतो व पुन्हा निघून जातो.)
- - व्हॉईट ब्रोड (खरबूलबूल)
- - स्पॉटेड डव्ह (ठिपकेदार व्होला)
- - अमूर फाल्कन (अमूर ससाणा)
- - वर्डिएटर प्लाय कॅचअप (निलांग-सोलापूर जिल्ह्यातून हा पक्षी केवळ कुरनूर धरण परिसरात दिसतो.)
- - इंडियन स्कीमर (या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे.नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला हा पक्षी कुरनूर धरण परिसरात दिसला.)