एल. डी. वाघमोडे
माळशिरस : आर. आर. आबा आता तरी थांबा... या चित्रपटातील कथेप्रमाणे माळशिरस येथील नंदीवाले समाजातील तरुणाने २० वर्षांनंतर पुन्हा शालेय जीवनात प्रवेश करून पदवीधर होण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी त्यांनी दहावीची परीक्षा दिली तर त्यांच्या मुलाने बारावीची परीक्षा दिली आहे.
पिता-पुत्र एकाचवेळी परीक्षा देण्याचा हा दुर्मिळ योगायोग आहे. मात्र, शालेय शिक्षणाला वय नसतं माणूस आयुष्यात कधीही शिकू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून मारुती व्यंकोजी सरगर व त्यांचा मुलगा संग्राम मारुती सरगर या भटक्या विमुक्त नंदीवाले समाजातील पिता-पुत्रांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
अशिक्षित समाजात वावर असल्यामुळे शिक्षणाचा गंध कुटुंबाला कधी लागला नव्हता. आई-वडिलांनी भिक्षा मागून मारुती सरगर यांचे दहावीपर्यंत शिक्षण केले; मात्र २००० साली दहावीच्या वर्गात नापास झाल्यानंतर त्यांचं लग्नही उरकून टाकण्यात आलं. भविष्यात व्यापार, कामधंदा त्यामुळे शिक्षण तिथेच थांबलं.
पुढे नंदीवाले भटक्या विमुक्त जाती-जमातींमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. मागास चालीरिती, हालअपेष्टा या सर्वांचे मूळ कारण शिक्षण असल्यामुळे त्यांनी स्वत: उच्चशिक्षित होण्याचा संकल्प करीत छत्रपती विद्यालय वडाचीवाडी या शाळेतून दहावीसाठी प्रवेश घेत ते परीक्षा देत आहेत.
पुढे पदवीधर पर्यंत शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाची दूरदृष्टी ठेवणाºया सरगर यांनी स्वत:च्या चारही मुलांना उच्च शिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला.
शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- शिक्षण हे वाघिणीचे दूध मानले जाते. अनेक विचारवंतांनी शिक्षणासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले; मात्र शिक्षणाच्या बाबतीत आजही अनेक समाजात मागासलेपणा दिसतो. शिवाय शिक्षण सुरू असताना या गोष्टीचे महत्त्व तरुणांना वाटत नसल्यामुळेही अनेक जण या वाटेवरून परत फिरतात. भटकंती करणारे ऊस तोडणी, वीटभट्टी अशा अनेक पद्धतीचे काम करणाºया कुटुंबात शिक्षणाला थारा नाही; मात्र या गोष्टीचे महत्त्व अनेकांना उशिरा कळते. शिक्षणात यश अपयशानं खचून जाणारे अनेक विद्यार्थी वेगळा मार्गही निवडतात. वयाचा विचार न करता ध्येयाने झपाटलेले अनेक जण पुन्हा शिक्षणाची कास धरताना दिसतात. त्यामुळे समाजाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.
मी आयुष्यात गरिबीचे चटके घेत शिक्षण घेतले; मात्र समाजात कोणी दिशादर्शक नसल्यामुळे शिक्षण घेणे सोडून दिले. पुढे व्यापारात पैसा कमावला; मात्र शिक्षण कमी असल्याची सल मनात कायम राहिली होती. त्यामुळे मी अनेकांना शिक्षणासाठी आग्रह करतो. त्याबरोबर स्वत:ही उच्चशिक्षित होण्याचा संकल्प केला असून, मी सध्या दहावीची परीक्षा देत आहे. - मारूती सरगर