सोलापूर/ करमाळा : राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते याचा आज मुुंबई येथील मातोश्रीवर होणारा शिवसेना प्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. माहिमचे आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्याने आज होणारा शिवसेना प्रवेश उद्या बुधवार २१ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी करमाळा येथुन शेकडो गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. दरम्यान, पक्षप्रवेश एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याने असंख्य कार्यकर्ते मुंबई व पुणे येथे मुक्काम करीत आहेत़ शिवसेना पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात बागल गटाचा सोमवारी संपर्क कार्यालयासमोर समर्थकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस विलासराव घुमरे, दिग्विजय बागल, राहुल जगताप, धनंजय डोंगरे, नानासाहेब लोकरे, बाळासाहेब पांढरे, चंद्रहास निमगिरे, सतीश नीळ, संतोष वारे, शौकत नालबंद, श्रीनिवास कांबळे, अविनाश घोलप, सचिन घोलप, अॅड़ ज्ञानदेव देवकर, रंगनाथ शिंदे उपस्थित होते.
गेल्या १३ वर्षांपासून शरद पवारांचे बोट धरून आम्ही राजकारणात आलो. त्यांचे व आमचे नाते एक नेता व कार्यकर्त्याच्याही पलीकडे आपुलकीचे आहे़ ते नाते कायम ठेवत जनतेला न्याय व सुरक्षितता देण्यासाठी लोकाग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला. तो लपून-छपून न घेता नेतेमंडळींना माहिती देऊन आणि पत्र लिहून घेतलेला असल्याचे स्पष्टीकरण बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी दिले.