सोलापूर / करमाळा : राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांनी आज मुुंबई येथील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू दिग्विजय बागल, विलासराव घुमरे याच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात बागल गटाचा सोमवारी संपर्क कार्यालयासमोर समर्थकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती़ या बैठकीत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मंगळवार २० आॅगस्ट रोजी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र माहिमचे आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्याने हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता़ ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मातोश्रीवर रश्मी बागल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश नीळ-पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन घोलप, अदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे आदींसह असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.
- २०१४ सालच्या करमाळा विधानसभेत रश्मी बागल यांचा २५७ मतांनी झाला होता पराभव होता.
- रश्मी बागल या दिवंगत माजी आमदार आणि मंत्री दिंगबर बागल यांच्या कन्या आहेत.