शीतलकुमार कांबळे, सोलापूर : जिल्हा कारागृहातील वसाहतीत उंदीर पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात उंदराऐवजी चक्क साप अडकला. सर्पमित्रांच्या मदतीने तस्कर या बिनविषारी सपास निसर्गात मुक्त करण्यात आले.
कारागृहाच्या परिसरात उंदीर अधिक झाले असल्याचे लक्षात घेत तेथे राहणारे संजय निंबाळकर यांनी रात्री पोलिस वसाहतीतील आपल्या घरात उंदीर पकडण्यासाठी पिंजरा लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी निंबाळकर यांनी पिंजरा तपासला तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या पिंजऱ्यात उंदीर नसून चक्क साप सापडला होता.
या घटनेची माहिती निंबाळकर यांनी सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना दिली. राहुल शिंदे यांनी तत्काळ सर्पमित्र शंतनू पुंडा व साई रासकोंडा यांना घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता असे लक्षात आले की, पिंजऱ्यात आधी उंदीर अडकला आणि नंतर साप उंदराच्या वासाने त्याचा पाठलाग करत पिंजऱ्यात येऊन सापाने उंदराला पकडले आणि खाल्ले आणि सापही पिंजऱ्यात अडकला. सर्पमित्रांनी सुरक्षितरीत्या सापास बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.