सोलापूर : केंद्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील १ हजार ५५७ रेशन दुकानांतून आधार लिंकने बायोमेट्रिक प्रणालीने धान्य वाटप करण्याची मोहीम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत दहा हजार कुटुंबांनी आधारकार्ड लिंक न केल्याने या बोगस कुटुंबांचे धान्य बंद करण्यात आल्याची माहिती सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वप्निल रावडे यांनी दिली.
रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीन वितरण करण्यात आले आहे. या मशीनच्या माध्यमातूनच धान्याचे वितरण सध्या सुरू करण्यात आले आहे. जिल्हाभरात एकूण ४ लाख २३ हजार कुटुंबांना या प्रणालीने धान्य वितरण करण्यात येत आहे. आधार कार्ड लिंकने धान्य वितरण करण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना रेशन दुकानात बायोमेट्रिक ठसे देण्याचे आवाहन पुरवठा खात्याकडून करण्यात आले होते. या मोहिमेनुसार जिल्ह्यातील ९५ टक्के कुटुंबांनी आधार कार्ड लिंक केले असून, या कुटुंबांना धान्य वितरित होत आहे.
दहा हजार कुटुंबांनी आधार लिंक न केल्याने या कुटुंबांना रेशन धान्य मिळण्यापासून अपात्र ठरविण्यात आले आहे. बोगसगिरीने या कुटुंबांकडून धान्य आतापर्यंत घेण्यात येत असल्याचा अहवाल पुरवठा खात्याकडून शासनाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने या कुटुंबांचा धान्य पुरवठा बंद केला आहे.
अंत्योदय योजनेतील ६० हजार व प्राधान्यक्रम योजनेतील ३ लाख ६० हजार कुटुंबांना सध्या रेशन दुकानांतून गहू, तांदूळ या धान्याचे वाटप करण्यात येत आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबास केवळ एक किलो साखर दरमहा देण्यात येत आहे. आॅनलाईन प्रणालीने धान्य वितरण करण्यात सोलापूर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर असल्याने शासनाकडून जिल्हा पुरवठा खात्याच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. आॅनलाईन प्रणालीने धान्य वितरणात मोहोळ तालुका आघाडीवर असून, या तालुक्यातील ९० टक्के वितरण या प्रणालीने होत आहे. सांगोला तालुक्यात ८९ टक्के तर माढा तालुक्यात ८८ टक्के आॅनलाईन प्रणालीने रेशन धान्याचे वितरण करण्यात येत आहे.
आधार नोंदणी करून बायोमेट्रिक प्रणालीने धान्य घेण्याचे आवाहन करूनही वर्षभरात दहा हजार कुटुंबांनी या मोहिमेस प्रतिसाद न दिल्याने या कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले आहे. भविष्यात या कुटुंबांना कोणत्याही परिस्थितीत धान्याचे वितरण न करता, त्यांची नावे आॅनलाईन प्रणालीतून काढण्याचे काम पुरवठा खात्याकडून सुरू करण्यात आल्याची माहिती रावडे यांनी दिली.
सर्व रेशन दुकानदारांकडे पॉस मशीनजिल्ह्यातील १ हजार ५५७ रेशन दुकानदारांकडे ई-पॉस मशीन देण्यात आले आहेत. या मशीनच्या माध्यमातूनच रेशन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. आॅफलाईन प्रणालीने एक किलोही धान्य देण्यात येत नाही. ज्या कुटुंबातील काही सदस्यांचे ठसे मशीनवर उमटत नाहीत त्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे ठसे उमटून त्या मशीनवर जुळून आले तर त्या कुटुंबांना धान्य देण्यात येत आहे.