सोलापूर : रेशन दुकानातून सरकार आता मीठ विक्रीला प्रोत्साहन देत आहे. हे मीठ हिमोग्लोबीनच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जात असून, त्याची विक्री रेशनिंगच्या माध्यमातून वाढविण्याची योजना सरकारने आखली आहे.
राज्यात नागपूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांत हा प्रयोग सुरू झाला आहे. त्यापाठोपाठ पुढील महिन्यात सोलापूर जिल्ह्यातही हे मीठ विक्रीसाठी पाठवले जाणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून धान्य वितरणासाठी ई-पॉस यंत्रणेचा वापर कसा होतो़ या संदर्भात आढावा घेण्यासाठी मागील तीन दिवसांपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर आहेत. शुक्रवारी सोलापुरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. डबल-४५ असे या मिठाचे नाव असून, त्यात हिमोग्लोबीन वाढीसाठी पोषक घटक आहेत.
नागपूर जिल्ह्यात मागील दोन महिन्यात ६० टन मिठाचे वाटप दुकानदारांच्या माध्यमातून झाले असून, या महिन्यात २८ टनाची मागणी आली असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच पुणे जिल्ह्यातही मीठ विक्रीची प्रक्रिया सुरू झाली असून, मिठाची वाहतूक झाली आहे. पुढच्या महिन्यात सोलापुरतील रेशन दुकानदारांना हे मीठ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
रेशन दुकानातून चार डाळींच्या विक्रीचा प्रस्ताव- भविष्यात रेशन दुकानांमधून तूर, हरभरा, मूग आणि उडीद या चार डाळींची विक्री करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहेत. तसा प्रस्ताव राज्य सरकारच्या अन्न पुरवठा विभागाकडे प्रस्तावित आहे. हमीभाव योजनेंतर्गत शेतकºयांकडून हे धान्य विकत घेऊन सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त दरात विकण्याची सरकारची योजना आहे.