सोलापूर : द्वारपोच धान्य योजनेतून रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत मोफत धान्य पोहोचणे अपेक्षित आहे. परंतु, शासनाने नेमलेला ‘खास’ वाहतूक कंत्राटदार ग्रामीण भागातील दुकानदारांकडून आजही वाहतूक व हमाली वसुली करीत आहे. जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग त्याला १५ नोटिसा बजावल्याचे सांगत आहे. ही वसुली बंद होत नसल्याने ग्रामीण भागातील १५०० रेशन दुकानदारांनी तालुका गोदामातून धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील ४ लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांना बसणार आहे. पुरवठा विभाग आणि दुकानदार यांच्या संगनमताने होणारा धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आघाडी सरकारने द्वारपोच धान्य योजना सुरू केली होती. वाहतूक खर्च न लागता दुकानदारांना धान्य मिळावे, दुर्गम भागातही धान्य मिळावे हासुद्धा यामागचा उद्देश होता. परंतु, कंत्राटदारांमधील कमिशनखोरीच्या हव्यासात या योजनेला हरताळ फासला जात आहे.
रास्त भाव धान्य दुकानदार, हॉकर्स संघटनेचे सचिव सुनील पेंटर म्हणाले, सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात धान्य पोहोचविण्याचा ठेका मुंबईच्या क्रिएटिव्ह कंझ्युमर्स सोसायटीला मिळाला आहे. या सोसायटीने पुन्हा रूपेश हरबा यांना वाहतुकीचे कंत्राट दिले आहे. सोलापूरच्या मुख्य शासकीय गोदामात धान्य पोहोचल्यानंतर ते तालुका पातळीवरील गोदामात पोहोचविले जाते. तालुका गोदामातून थेट दुकानदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी रूपेश हरबा यांनी पुन्हा वेगळे कंत्राटदार नेमले आहेत. हे तालुका पातळीवरील कंत्राटदार ग्रामीण भागातील रास्त भाव धान्य दुकानदारांकडून वसुली करीत आहेत. या वसुलीला दुकानदारांचा आक्षेप आहे.
मंत्रालयातील संबंधांच्या जोरावरच्शहरातील दुकानांपर्यंत व्यवस्थित धान्य पोहोचते, पण ग्रामीण भागातील काम नेहमीच विस्कळीत असते. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी ठेकेदाराला नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, ठेकेदार अधिकाºयांना जुमानत नाही. मंत्रालयातील संबंधाच्या जोरावर तो कारवाई होऊ देत नसल्याची चर्चा आहे.
धान्य पोहोचविण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. त्याला १५ पेक्षा जास्त नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रेशन दुकानदारांनी धान्य घेतलेच पाहिजे. ठेकेदाराने वाहतूक आणि हमालीचे पैसे घेतले असतील तर त्याच्या पावत्या जोडाव्यात. ठेकेदाराच्या बिलातून हे पैसे वजावट करण्यात येतील, पण दुकानदारांना धान्य घ्यावेच लागेल. - श्रीमंत पाटोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर.
दिवाळीच्या तोंडावर वरिष्ठ अधिकाºयांच्या सांगण्यावरून ग्रामीण भागातील दुकानदारांनी हमाली व वाहतुकीचा खर्च करून धान्य आणले. मूळत: हे काम ठेकेदारांनीच करणे अपेक्षित आहे. परंतु, पुरवठा विभागातील अधिकारी दुकानदारांना दम देऊन धान्य उचलण्यास भाग पाडत आहेत. खरे तर शासकीय अधिकाºयांनी ठेकेदाराला दम देऊन वसुली बंद केली पाहिजे. त्याऐवजी ते दुकानदारांना त्रास देत आहेत. यामुळेच ग्रामीण भागात धान्य उचलले जाणार नाही. - सुनील पेंटर, सचिव, रास्त भाव धान्य दुकानदार हॉकर्स संघ, सोलापूर