पोलीस सूत्रांनुसार पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना बुधवारी मोडनिंब येथील मार्केट यार्डमधील गोरख पांडुरंग सुर्वे या अडत दुकानातून रेशनचा गहू व तांदूळ ट्रकमध्ये भरला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. कारवाईसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व फौजदार पी. व्ही. काशीद यांचे पथक पाठविण्यात आले.
हे पथक बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. तेव्हा (एमएच ४५ एएफ ००५४) मालट्रकमध्ये गव्हाची पोती भरत असल्याचे निदर्शनास आले. तसेच गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले तीन लाख ४० किमतीच्या ३५० गोण्या गहू व ७९ हजार किमतीचा १५० गोण्या तांदूळ आढळून आला. तसेच गव्हर्नमेंट ऑफ पंजाब असा शिक्का असलेली रिकामी पोतीही आढळून आली. ट्रकमधील गव्हाचे वजन केले असता ते २५,०८० किलो भरले. त्याची किंमत अंदाजे चार लाख २५ हजार एवढी आहे. असा एकूण नऊ लाख ४४ हजार किमतीचा माल बेकायदेशीर विक्री करण्यासाठी ट्रकमध्ये भरत असताना पोलिसांना मिळून आला. हा सर्व माल रेशनचा असल्याचा संशय आल्याने या घटनेची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंठलवार यांना फोनवरून देण्यात आली. तसेच माढा तालुका दंडाधिकाऱ्यांनाही या आडत दुकानांमधील गहू व तांदळाची तपासणी करून पंचनामा व पुढील कार्यवाही करण्याबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात आले.
यानंतर बुधवारी रात्री ८.३०च्या सुमारास पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंठलवार, तलाठी वैभव पाटील, महेश राऊत व राजेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तेव्हा आडत दुकानदार संतोष सुर्वे यांनी ट्रकमध्ये भरलेला माल अंदाजे नऊ लाख ४४ हजारांचा असल्याचे सांगितले. पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंठलवार यांनी ट्रकमधील व अडत दुकानातील गहू व तांदळाची तपासणी केली. गोडावूनमध्ये आढळलेली गव्हर्नमेंट ऑफ पंजाब असा शिक्का असलेला रिकामा बारदाना पाहून प्रथमदर्शनी हा प्रकार संशयास्पद असल्याने पुढील कारवाई करावी, असा रिपोर्ट गुरुवारी ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता दिला.
---
दुकानदार,चालक अन् क्लिनवर गुन्हा
यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी गुरुवारी अडत दुकानदार सतीश माणिक सुर्वे (रा. बैरागवाडी ता. माढा), ट्रक मालक व चालक रामेश्वर भगवान देठे (वय २३, रा. चिखलबीड जि. बीड) व क्लिनर तुषार गोवर्धन फड (वय २१, रा. घाटसावळी जि. बीड) यांच्याविरुद्ध भादंवि ४२०, ३४ सह अत्यावश्यक वस्तू व सेवा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
----
महसूल प्रशासनाची ‘वेट ॲन्ड वॉच’ भूमिका
पोलिसांनी एवढी मोठी कारवाई करूनही महसूल प्रशासनाने मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. घटना घडून दोन दिवस होत आले तरी महसूल प्रशासनाकडून तपासणीसाठी गहू व तांदळाचे नमुने घेण्यात आलेले नाहीत. शेवटी फौजदार पी. व्ही काशीद यांनी फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.
----
ज्यांनी कारवाई केली त्यांनीच फिर्याद द्यायची असते. आम्ही कारवाई केली नाही तर आम्ही फिर्याद देण्याचा प्रश्नच येत नाही.
- राजेश चव्हाण, तहसीलदार माढा
----