विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आल्यामुळे शहर व तालुक्यातील राजकीय वातावरण काहीसे शांत होते. मात्र, कोरोना कमी आला आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. आता पुढील काही महिन्यांत बार्शी नगरपालिकेची निवडणूक आहे, तसेच वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यास त्याठिकाणीदेखील निवडणूक होणार आहे. या दोन्ही पालिकांच्या निवडणुका म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच ठरणार आहे़
दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था या लोकांच्या मूलभूत प्रश्नांशी निगडित अशा आहेत. सध्या वैराग ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांचे वर्चस्व होते. मात्र, सध्यातरी शासनाने नगरपंचायतीत रूपांतर करण्याची प्रक्रिया ही अंतिम केलेली नाही. नोव्हेंबर महिन्यात बार्शी नगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे हे सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात घेण्यासाठी या प्रमुख दोन नेत्यांसोबत राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर हे प्रयत्नशील आहेत. नगरपालिकेवर सध्या आ. राजेंद्र राऊत गटाची सत्ता आहे. चाळीसपैकी २९ नगरसेवकांसह नगराध्यक्ष त्यांच्या गटाचा आहे, तर सोपल गटाचे ११ सदस्य निवडून आले होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. राजेंद्र राऊत यांनी ‘आमदार आपल्या दारी’ हे संपर्क अभियान सुरू केले आहे. शहरात कोट्यवधींची केलेली विकासकामे हे त्यांचे बलस्थान आहे, तर दुसरीकडे माजी आ. दिलीप सोपल हे मध्यंतरीच्या काळात काहीसे शांत होते. मात्र, त्यांनीदेखील अंग झटकून कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती ही वाढली आहे. वैरागला संपर्क कार्यालय सुरू करून दोन दिवस वैरागकरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. सोमवारीच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सोपल यांनी भेट घेतली आहे़ भाऊसाहेब आंधळकर हेदेखील अन्नछत्राच्या माध्यमातून सक्रिय आहेत. राजेंद्र मिरगणे हे आ. राऊत यांच्यावर सातत्याने पालिकेतील विकास कामांच्या गुणवत्तेवर टीका करून चर्चेत आहेत.
----
एकत्र लढणार की, सवतेसुभे मांडणार
आ. राऊत यांच्या विरोधात दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर हे एकत्र येऊन लढणार, की आपले सवतेसुभे मांडणार यावरदेखील या निवडणुकीचे भावितव्य अवलंबून आहे. शहरात काँग्रेसला मानणारादेखील एक वर्ग आहे. शहराध्यक्ष जीवदनदत्त अरगडे हेदेखील सोशल मीडियाच्या माध्यातून, तसेच कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय आहेत.