भीमानगर : रांझणी (ता. माढा) येथे दूधदरवाढ मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने सरकारच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून निषेध करण्यात आला.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकर्यांना प्रा. पाटील म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील दूध उत्पादकांच्या दुधाला दर खूप कमी मिळत आहे. दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दूध व्यवसायामध्ये खासगी दूध संघाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सरकारने येत्या १० दिवसात दुधाला हमीभाव देऊन दरवाढ द्यावी, अन्यथा राज्यातील दूध पुरवठा रयत क्रांती संघटना बंद पाडेल, असा इशारा दिला आहे. सध्या दुधाला प्रति लिटर १८ ते २० रुपये इतका अत्यल्प दर मिळत आहे.
गाईच्या दुधाला प्रति लिटर ३० रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये हमीभाव करण्यात यावा. पशुखाद्याचे दर वाढले असून शेतकऱ्याला वैरणही विकत आणावी लागत आहे. त्यामुळे दूध धंदा तोट्यात आहे. शेतकरी स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुग्ध व्यवसायावर अवलंबून असतो. लाॅकडाऊनचे कारण पुढे करीत दुधाचे दर कमी केले आहेत. सरकारने खासगी दूध संघांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी रांझणीचे माजी सरपंच आप्पा यादव, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक नारायण गायकवाड, विकास चव्हाण, ओंकार गाडे, पिनू पोळ, अनिल जाधव, देवा माने, गणेश चव्हाण, आबा बागल, भैरू चव्हाण, राहुल पोळ, गणेश पोळ, दादा मदने, अमोल जाधव, वसंत चव्हाण, टिंगरे किरण पोळ, बाळू भिसे, शिवाजी थोरात उपस्थित होते.
----
फोटो : १० रांझणी
रांझणी येथे दूधदरवाढ मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने सरकारच्या निषेधात्मक प्रतिमेला दुग्धाभिषेक घालताना प्रा. सुहास पाटील, आप्पा यादव, नारायण गायकवाड, विकास चव्हाण, ओंकार गाडे.