सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २२ बीएएमएस (आयुर्वेद) कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे करार संपून २ ते ४ महिने झाले आहेत. परत नवीन करार करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्ज सादर केले आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांना सेवेत सामावून घेतले नाही.
आचार संहितेचे कारण सांगून करार करण्यास टाळाटाळ
जिल्हा आरोग्य विभागात चौकशी केली असता नवीन करार करण्यासाठी आचारसंहिता असल्याचे सांगत आहेत. तथापि आचारसंहिताच्या अगोदर करार संपलेले आहेत. आचार संहिता आता तूर्त लागू झाली आहे. सांगली व सातारा जिल्ह्यात असेच बीएएमएस (आयुर्वेद) कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे करार संपलेले असताना त्या ठिकाणी त्यांना चार दिवस ब्रेक देऊन लगेच नवीन करार करून सेवेत सामावून घेतले आहे. असे असताना सोलापूर जिल्ह्यात असे होताना दिसत नाही.