सोलापूर : ब्रिटिश राजवटीत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू यांनी दिलेले बलिदान वाचणे आवश्यक असले तरी तसा इतिहास घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या रक्षणासाठी तरुणांनी सज्ज रहावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री शैलेंद्र दळवी यांनी केले. शिवस्मारक सभागृह येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संमेलनात शैलेंद्र दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख रेवणसिद्ध प्याटी, महामंत्री चेतन शर्मा, महानगर अध्यक्ष धन्यकुमार बिराजदार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवा संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात बोलताना शैलेंद्र दळवी म्हणाले की, जगाच्या पाठीवर भारत हा सर्वात तरुण देश आहे. तरुणाई ज्या दिशेने जाते त्याच दिशेने देश जात असतो. देशावर ज्यावेळी संकट येते त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मदतीसाठी धाऊन जात असते. देशाचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक तरुणाचे रक्त सळसळले पाहिजे. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे. न्यायिक भावनेने सर्वांची मदत करावी. सध्या महाविद्यालयांमध्ये निर्माण झालेले गढूळ वातावरण नाहीसे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाईट मार्गाला जाणाऱ्या तरुणाला आवरून त्याला चांगली दिशा देण्याचे काम केले पाहिजे. जागतिक पातळीवर देशावर जर संकट आले तर रक्षणासाठी सज्ज असले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पाटील यांनी केले तर आभार रेवणसिद्ध प्याटी यांनी मानले. -----------------लाख सदस्यांचा मानसयंदाच्या शैक्षणिक वर्षात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन वाढीवर भर दिला पाहिजे. राज्यातून एक लाख सदस्य करण्याचा मानस आखण्यात आला आहे, त्यासाठी जोमाने काम करावे, असे यावेळी शैलेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
‘देशाच्या रक्षणासाठी सज्ज रहावे’
By admin | Published: July 18, 2014 1:41 AM