साेलापूर : शहरातील अंतर्गत भागात अरुंद रस्ते असल्यामुळे आठ ठिकाणी वाहतुकीची मोठी काेंडी निर्माण होत असते. कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले असून, यावर प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
जिल्हा परिषद समोरील पूनम गेट ते सिद्धेश्वर प्रशाला, पूनम गेट ते विजापूरवेस या दोन रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. या रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. पूनम गेट ते सिद्धेश्वर प्रशाला मार्गावर दोन्ही बाजूला अनेक दुकाने आहेत. दुकानांसमोर दुचाकी वाहनांची पार्किंग असते, त्यामुळे मुळात अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद हाेतो. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागते. पूनम गेट ते बेगम पेठ व विजापूरवेस या मार्गावर अशाच पद्धतीची वाहनांची वर्दळ दिसून येते. पुढे विजापूरवेस ते मधला मारुती मंदिर रस्त्यावरही वाहनांची मोठी कोंडी होत असते. दोन्ही बाजूला कपड्यांची दुकाने, हॉटेलशिवाय रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी थांबलेल्या चारचाकी गाड्या असतात. जाणाऱ्या व येणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
मधला मारुती मंदिर ते बाळीवेस मार्गावर दोन्ही बाजूला हॉटेल्स, दुकाने, रस्त्यांच्या कडेला फळांच्या गाड्या लागलेल्या असतात. हाच प्रकार मधला मारुती मंदिर ते कन्ना चौक पर्यंत पाहावयास मिळतो. मधला मारुती मंदिर ते सराफ बाजार, मंगळवार पेठ पोलीस चौकीपर्यंत एकेरी मार्ग आहे. मात्र, रस्त्यावरील पार्किंग व विक्रीच्या गाड्या लागल्याने रस्ता दिसून येत नाही. माणिक चौक ते दत्त चौक, लक्ष्मी मार्केट ते दत्त चौक हे दोन्ही मार्ग अरुंद असल्याने वाहने अडकून पडण्याचे प्रकार सतत घडतात.
रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळा
- ० कन्ना चौक, कोंतम चौक, बाळीवेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा या भर रस्त्यावर उभ्या असतात. रिक्षांमुळे रस्ते व्यापले जातात आणि अन्य वाहनचालकांना कसरत करीत प्रवास करावा लागतो.
- ० मेकॅनिकी चौकाच्या कडेला असलेल्या पर्किंगमध्ये चारचाकी वाहने रस्त्यावरही थांबविली जातात. नवी पेठ व एकेरी मार्गातून येणाऱ्या वाहनांना याचा त्रास सहन करावा लागतो.
- ० मंगळवार पेठ पोलीस चौकी ते कुंभारवेस मार्गावर दोन्ही बाजूने व्यापाऱ्यांच्या मालगाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅरिकेटस
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने पुतळ्यापासुन भागवत चाळीपर्यंत लोखंडी बॅरिकेटस लावले आहेत. पुढे मेकॅनिकी चौकापासून नवी वेस पोलीस चौकीच्या समोरील रस्त्यापर्यंत बॅरिकेटस लावण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सरस्वती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना भागवत चाळीच्या बाजूने असलेल्या एकेरी मार्गावरून जाता येणार आहे. सरस्वती चौक, रेल्वे स्टेशन व नवी पेठेतून येणाऱ्या वाहनांना भागवत थिएटर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबणाऱ्या रिक्षांना काळी मशिदीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याच्या कडेला थांबण्यास जागा दिली आहे. सध्या नियोजन चांगले करण्यात आले आहे; मात्र यामुळे वाहतुकीची कोंडी किती कमी होणार हे सोमवारपासून लक्षात येणार आहे.