सोलापूर: फेसबुक या सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचे वृत्त समजताच सर्वप्रथम कुर्डुवाडीत संतप्त जमावाकडून शनिवारी रात्री १२.३० च्या दरम्यान वल्लभनगर (पुणे)-औसा ही बस पेटवून दिली. बसमधील सीटवर पेट्रोल ओतून पेटविल्याने गाडीचे जास्त नुकसान झाले नाही. शिवाय दोन बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. याचे लोण रविवारी सकाळी संपूर्ण जिल्ह्यात पसरले. संपूर्ण वाहतूक बंद असल्याने रविवारी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. जिल्ह्यात पुन्हा एस.टी.लाच लक्ष्य केल्याने तब्बल जिल्ह्यातील १८ आणि परजिल्ह्यातील १२ बसच्या काचा फोडण्यात आल्याने लाखोंचे नुकसान झाले.बघता-बघता काही क्षणात जिल्ह्यातील सर्व गावे बंद झाली. ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. टेंभुर्णीत आठ बसच्या काचा फोडल्या, मोहोळमध्ये दोन बस, बार्शीत तीन बस, पंढरपूरमध्ये सहा बस, सांगोल्यात सहा बसच्या दगडफेकीत गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण होते. मोहोळ व सांगोल्यातील आठवडा बाजारही बंद केल्याने शेतकरी, व्यापारी व नागरिकांचे अतोनात हाल झाले.कुर्डूवाडीत बायपास रोडवर वल्लभनगर (पुणे)-औसा (क्र. एमएच २० / बी एल २५५०) ही बस सारथी हॉटेलजवळ आली असता मोटरसायकलवरून आलेल्या २० ते २५ जणांच्या जमावाने बसवर दगडफेक केली़ प्रवासी उतरल्यानंतर जमावातील लोकांनी बाटलीतील पेट्रोल बसच्या समोरील बाजूस सीटवर टाकून पेटवून दिले. सांगोला येथील आंबेडकरप्रेमींनी शनिवारी मध्यरात्रीच सांगोला बंदची हाक दिली. सांगोला बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर रविवार आठवडा बाजार असतानाही शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला नाही.
जिल्ह्यात पुन्हा तोडफोड, तणाव
By admin | Published: June 09, 2014 12:50 AM