तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी व कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग कमी व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व तालुक्यातील गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर तालुक्याच्या हद्दीवर तुंगत गाव आहे. या गावाची लोकसंख्या सात हजार पाचशेच्या आसपास आहे. परंतु मागील पाच दिवसात या गावात फक्त ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तरी या गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुका बंद आहे, तर तुंगतच्या लगतचे पेनूर गाव सुरू आहे. संचारबंदीच्या कालावधीत किमान शेतीची कामे तरी सुरू राहावीत, यामुळे तुंगत येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक व अन्य कामांसाठी पेनूरला खरेदीसाठी जात आहेत.
---
पंढरपूर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली नाही. परंतु तुंगत (ता. पंढरपूर) येथे कोणी संचारबंदीचे नियम मोडू नये, यासाठी पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू करण्यात आले.
- विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर
----
रोज होतात कोरोना टेस्ट
पंढरपूर तालुक्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. यामुळे अधिक लोकसंख्या असलेल्या गावात कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याचप्रमाणे तुंगत गावात रोज पन्नास ते साठच्या आसपास नागरिकांची कोरोनाची चाचणी केली जात आहे. आम्ही ग्रामस्थांना घराबाहेर पडू नका, संचारबंदीच्या नियमांचे पालन करा, असे सतत सांगत असल्याची माहिती सरपंच आगतराव रणदिवे यांनी दिली.
---