सांगोला : गावाच्या विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मेथवडे (ता. सांगोला) ग्रामपंचायतीच्या नऊ जागांवर महिलांची बिनविरोध निवड करून इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श निर्माण केल्याने माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी या गावाला भेट देत नवनिर्वाचित महिला सदस्यांशी संवाद साधत त्यांचा सत्कार केला. मेथवडे गावातील ज्येष्ठ नेतेमंडळीसह तरूणांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबरोबरच महिलांच्या हाती गावाचा कारभार देऊन राज्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे. महिलांनी या संधीचे सोने करून एकोप्याने गावाचा विकास करून ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवावा. तसेच अडचणीच्या काळात मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन, असे आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, ॲड. गजानन भाकरे, बाजार समितीचे सभापती गिरीश गंगथडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, माजी सरपंच जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळ ::::::::::::::::
मेथवडे ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित महिला सदस्यांचा सत्कार आमदार सुभाष देशमुख यांनी केला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.