विलास जळकोटकर सोलापूर : चाळ म्हटलं की समोर चित्र उभं राहतं ते कौलारू छोटी-छोटी घरं... एकमेकांमध्ये असलेलं घट्ट नातं... सुखदु:खांमध्ये आपलेपणानं धावून येणारी माणसं... हेच घट्ट नातं सोलापूरच्या चाळसंस्कृतीनं आजही जपलं आहे. एकेकाळच्या गिरणगाव सोलापुरातील सर्वात जुन्या पाऊणशे वर्षाकडे वाटचाल करणारी जुनी मिल चाळ आजही दिमाखात उभी आहे. सोलापूरच्या इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणाºया चाळीनं आपुली अन् माणुसकीचा ओलावा जपला आहे.
सुपर मार्केटच्या बाजूलाच असलेल्या छोटेखानी प्रवेशद्वारातून जुनी मिल चाळीत प्रवेश करताच अरुंद रस्त्याच्या आजूबाजूला बसकी कौलारू घरे लागतात. त्यावेळी जुनी मिलमध्ये काम करणाºया कामगारांसाठी मिलमालक मोरारका शेठ यांनी चाळ बांधली. यामध्ये एक, दीड, दोन, अडीच, अशा प्रकारची ४८८ घरे बांधली. या चाळीत ११ माड्या, ५ बसक्या घरांची लाईन आढळते. चाळीतून प्रवेश करत आणखी पुढे गेलं की गर्द झाडांची सावली अन् दोन्ही बाजूला माड्यांची घरे दिसतात. महादेव मंदिराजवळ पोहोचताच पारावर चार-पाच बुजुर्ग मंडळींच्या गप्पा सुरू होत्या. यात शिंगाडे गुरुजी, पंचाहत्तरीच्या वाटेवर असलेले निवृत्तीधारक प्रकाश कोथिंबिरे भेटले. त्यांच्याशी संवाद सुरू झाला.
मिलमध्ये काम करणाºया सर्वांचीच परिस्थिती तशी बेताची. परगावाहून आलेल्या साºयांनाच खºया अर्थाने आधार दिला तो जुनी मिलने. तीन पाळ्यांमध्ये काम चालायचे. गिरणीच्या भोंग्यावरच सर्वांचा नित्यक्रम चालायचा. त्यावेळी ३० ते ५० रुपये असा पगार कामगारांना होता; पाच पैशाला तीन तास सायकल भाड्याने मिळायची. सोने २० रु. तोळा मिळे. मनोरंजनासाठी चाळीतच नाटके बसवली जायची. धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असे.
आता वसलेल्या सुपर मार्केटच्या जागी पूर्वी खेळाचे मैदान होते. त्याला ‘चेंडू-फळी’ मैदान म्हटले जायचे. कामगारांसाठी मिल मालकाने स्वमालकीच्या जागेवर चाळी उभारून भाड्याने राहण्यासाठी दिल्या. पुढे दामोदर शंकर बोधले यांनी जुनी मिल चाळ भाडेकरू (वीरचंद) मालकी गृहनिर्माण संस्था नावाने (१९७८) नोंदणी केली. त्याचे पहिले चेअरमन बोधले यांना केले. १९८२ साली विष्णुपंत कोठे यांच्या काळात चाळ विकत घेतली गेली. त्या कामगारांच्या नावावर झाल्या. मिल बंद पडून जवळपास ५० वर्षे होऊन गेली. वाढत्या कुटुंबामुळे चाळीतील काही मंडळी अन्य ठिकाणी वास्तव्यास गेली आहेत. पण इथला आनंद अन्यत्र नाही, चाळीचे नवे रूप झाल्यास परतण्यास उत्सुक आहेत. ही आपुलकी चाळीनं जपल्याचा प्रत्यय चाळवासीयांशी संवाद साधताना आला.
चाळीतील प्रसिद्ध व्यक्ती..........
- - स्वातंत्र्यसैनिक दामोधर शंकर बोधले, स्वा. सै. शंकरप्पा गुरुसिद्धप्पा करजगी, स्वा.सै. लिंबाजी व्यवहारे, स्वा.सै. मोतीलाल कनिराम कोथिंबिरे, हिरालाल कनिराम कोथिंबिरे, स्वा. सै. तुकाराम चटके, कृष्णात निवृत्ती खडके, रामचंद्र डोलारे, अण्णासाहेब कोंगे, काशिनाथ राऊत.
- - राजकीय- विष्णुपंत कोठे, कुमार करजगी, हरिभाऊ व्यवहारे (माजी नगरसेवक), भीमराव यादव (माजी नगरसेवक), विनायक कोंड्याल.
- - जुने पैलवान - पापय्या सर्जनकर, अर्जुन मुक्ताजी घोडके, प्रकाश सुरवसे, श्रीरंग पैलवान, विजयकुमार बिराजदार, संदिपान पवार, महादेवप्पा पाटील, भगवान मळगे.
- - उच्च शिक्षित- बंडू पत्की, अय्युब शेख, देवीदास पाटील (अभियंते), नारायण चोपडे (सी. ए.).
- ४प्रमुख उत्सव - गणेशोत्सव, शिवजयंती.
- - जुने हॉटेल - माणिकचंद (मालक - ढोबळे), रामभाऊ पानवाला, मारुती भजीवाला.
- - पाच सार्वजनिक उत्सव मंडळे
- - १ शिवजयंती, ३ गणपती मंडळे, नवरात्र ३
दृष्टिक्षेपात चाळ
- - १९४४ साली वीरचंद चाळीची स्थापना (सध्याची जुनी मिल चाळ)
- - एकूण घरे ४८८ (११ माड्या आणि बसकी घरे)
- - मंदिरे - महादेव, विठ्ठल-रुक्मिणी, गणपती