बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लॉकडाऊननंतर बाजार सुरू झाला आणि प्रथमच दररोज ज्वारीची २५ हजार कट्टे आवक सुरू आहे. एकीकडे जादा आवक तर दुसरीकडे राज्यातील सर्व बाजार हे पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ग्राहक नाहीत. दर मात्र खूपच कमी झाले आहेत. ज्वारीला १६०० पासून ४१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
बार्शी तालुक्यात ज्वारीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिवाय बार्शीच्या बाजारात दोन जिल्ह्यांतून भुसार मालाची आवक होत आहे. बार्शीची ज्वारी ही शाळू म्हणून ओळखली जाते. याठिकाणच्या ज्वारीला वेगळी अशी चव असल्याने राज्याच्या विविध भागांतून मागणी आहे. ज्वारीची काढणी झाली आणि लॉकडाऊन झाले. त्यामुळे ग्राहक बाहेर पडले नाहीत. तसेच ज्वारी काढणीच्या वेळी पाऊसही पडला होता. त्यामुळे काही ठिकाणी ज्वारी भिजली. त्यामुळे यंदा ज्वारीचे दर घसरले आहेत. उच्च दर्जाच्या चांगल्या ज्वारीला अद्यापही चांगला दर मिळत असल्याचे खरेदीदार तुकाराम माने यांनी सांगितले.
----
चिंच, हरभऱ्याचे दर घसरले
बाजार समितीत उन्हाळी उडदाचीही आवक सुरू झाली आहे. उडदाची ७०० ते ८०० कट्टे आवक असून दर हा ७००० ते ७२०० मिळत आहे. चिंचेचा सिझन हा संपत आला आहे. तसेच पाऊस पडलेला असतानाही मागणी आहे. मध्यंतरी चिंचेचे भाव तीन हजारांखाली होते. मात्र, या आठवड्यात त्यात वाढ होऊन चिंच ४ ते ५ हजार रुपये क्विंटल विक्री होत आहे. तुरीचा दर मागील महिन्यात ६८०० ते ७४०० रुपये क्विंटल होता. त्यात घट होऊन ५३०० ते ५८०० रुपयांवर आला आहे. आवक अडीच ते तीन हजार कट्टे आहे. हरभऱ्याचे दर ही कमी झाले आहेत. पूर्वी ५१०० ते ५३०० रुपये दर होता आता ४५०० ते ४६०० रुपये झाला आहे. चार ते पाच हजार कट्टे आवक आहे.