सोलापूर : कोरोना काळातही लाच घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. २०२० व २०२१ या कालावधीत पोलीस खात्यामध्ये आठ कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन पोलीस अधिकारी तर तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल न करण्यासाठी तर काहींनी गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पैशाची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २०२० या कोरोनाच्या वर्षात शासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर २५ कारवाया करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२१ पर्यंत १४ कारवाया करण्यात आल्या असून, त्यामध्ये १९ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कारवाईमध्ये शहर व जिल्ह्यातील जलसंधारण उपविभाग, सोलापूर महानगरपालिका, भूमी अभिलेख विभाग, पोलीस खाते, महसूल विभाग, ग्रंथालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या., आयटीआय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, पंचायत समिती, अन्य भ्रष्टाचारासंदर्भात कारवाया झाल्या आहेत. २०२० मध्ये पोलीस खात्यातील तीन कर्मचाऱ्यांना पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. २०२१ मध्ये पाच कारवायांमध्ये ६ जणांना पकडले होते.
तीन हजारांपासून, साडेसात लाखांपर्यंतची लाच
पोलीस नाईकाला अटक...
० सदर बझार पोलीस ठाण्यात दि.६ जानेवारी २०२१ रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात एका व्यक्तीला आरोपी न करण्यासाठी तेथील तत्कालीन पोलीस नाईकाने संबंधिताला दोन लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करण्यात आली होती. पथकाने शहानिशा करून दि.८ जानेवारी २०२१ रोजी पोलीस नाईकाच्या सांगण्यावरून खासगी इसमाला दोन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यामध्ये पोलीस नाईकालाही अटक झाली होती.
पोलीस कॉन्स्टेबलला केली अटक
० वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करतो असे सांगून तत्कालीन पोलीस कॉन्स्टेबलने संबंधिताला १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. दि.१ ऑक्टोबर २०२० रोजी पहिला हप्ता म्हणून तीन हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. पोलीस कॉन्स्टेबलला अटक करून त्याच्याविरुद्ध त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकाला केली अटक
० शहरातील डोणगाव परिसरात मुरुम चोरून नेल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. त्यावरून सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत आठ डंपर जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. डंपर सोडण्याकरिता व गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला अटक न करण्यासाठी साडेसात लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. दि.१० जुलै २०२१ रोजी छत्रपती संभाजी महाराज पुतळा जुना पुणे नाका येथे सहायक पोलीस निरीक्षकाला साडेसात लाख रुपये घेताना अटक करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षकालाही अटक झाली होती.
या वर्षात झालेली कारवाई अशी...
- जानेवारी : ०१
- फेब्रुवारी : ००
- मार्च : ००
- एप्रिल : ०१
- मे : ०१
- जून : ०१
- जुलै : ०१
लाच मागितली जात असेल तर येथे संपर्क साधा....
० कायद्याने लाच घेणे व देणे गुन्हा आहे. शासकीय कर्मचारी, अधिकारी एखादे काम करण्यासाठी पैशाची मागणी करीत असतील तर संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर, शासकीय इमारत, रंगभवनजवळ सोलापूर येथे संपर्क साधवा. टोल फ्री नं. १०६४ किंवा कार्यालयातील क्र. ०२१७/२३१२६६८ वर संपर्क साधावा असे आवाहन ॲन्टी करप्शन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजीव पाटील यांनी केले आहे.