करमाळा : कुकडी प्रकल्पात सध्या ४.५० टी.एम.सी.पाणी शिल्लक असून, कुकडीचे पाणी सध्या १०५ कि.मी.अंतरापर्यंत सुरू आहे़ करमाळा तालुक्याच्या १७८ कि .मी.अंतरापर्यंत असलेल्या मांगी तलावापर्यंत हे पाणी पोलीस बंदोबस्तात पोहच करण्याची ग्वाही कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता भा.रा.बोकडे यांनी दिली.कुकडीचे पाणी करमाळा तालुक्यातील टंचाईग्रस्त भागास मिळावे, ही मागणी सर्वपक्षीयांकडून होत असून, आज या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुकडी प्रकल्पाच्या कोळवडी, ता.कर्जत येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. कुकडीचे कार्यकारी अभियंता भा.रा.बोकडे यांची भेट या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली. शिष्टमंडळात रा.काँ.चे तालुकाध्यक्ष विलासराव घुमरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे, कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुचित बागल, आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे,पं.स.चे माजी सभापती बापूराव गायकवाड,विलास बरडे, बाजार समितीचे संचालक दादासाहेब जाधव,संदीप शेळके,शिवशंकर जगदाळे,राजाभाऊ बागल उपस्थित होते.महेश चिवटे म्हणाले की, कुकडीचे हक्काचे पाणी तालुक्यास टंचाई परिस्थितीमध्ये मिळाले नाही तर उन्हाळी पिकांचे तब्बल ४० कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे.कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुचित बागल म्हणाले की, गतवर्षीची व आगाऊ पाणीपी भरण्यास आम्ही तयार आहोत, पाणी सोडा. विलासराव घुमरे म्हणाले की, कुकडीतून येणार्या पाण्याचे नियोजन चुकीच्या पध्दतीने होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे़ दरवर्षी पावसाळ्यातच मांगी तलाव कुकडीच्या पाण्याने काटोकाट भरून घेण्याची आमची मागणी आहे़ सध्या १०५ कि.मी़ पर्यंत सुरू असलेले कुकडीचे पाणी १७८ कि.मी.पर्यंत मांगी तलावापर्यंत येण्यासाठी पालकमंत्री दिलीप सोपल,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उद्याच भेटून राज्याचे पाटबंधारे मंत्री शशिकांत शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी करू, असे सांगितले. (वार्ताहर)
कुकडीचे पाणी पोलीस बंदोबस्तात पोहचणार शेतकर्यांना दिलासा: कार्यकारी अभियंत्याची माहिती
By admin | Published: May 08, 2014 10:06 PM