सोलापूर : महापालिका शहरी आरोग्य अभियान अंतर्गत भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करार तत्त्वावर राबविण्यात येत आहे. ९ संवर्गातील ४९ पदांसाठी एकूण ७०६ अर्ज महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी पदासाठी उद्या १८ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्थायी समिती बैठकीच्या कक्षात मुलाखत होणार आहे.
दरम्यान, मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदासाठी २ ते १० मे २०२३ दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग व प्रसती तज्ञ, साथ रोग तज्ञ, जी एन एम, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एएनएम आदी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. आलेल्या अर्जाची छाननी सुरू आहे. त्यानंतर पुढील नियोजनानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी युपीएचसी पूर्णवेळ या पदाच्या ४ जागांसाठी एकूण २२ अर्ज प्राप्त झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी प्रसूतीगृह पूर्ण वेळ या पदाकरिता दोन जागांसाठी ३ अर्ज आले आहेत. वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ या पदासाठी एकही अर्ज आला नाही. स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ या अनुसूचित जातीसाठी असलेल्या एका पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. साथ रोग तज्ञ या खुला प्रवर्गासाठी एक जागा असून त्यासाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. जीएनएम या आर्थिक दुर्बल घटकाच्या प्रवर्गासाठी एक जागा असून त्यासाठी एकूण १८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. लॅब टेक्निशियन या पदासाठी एकूण १९ अर्ज प्राप्त झाले आहेत. फार्मासिस्ट या पदासाठी या दोन जागांसाठी ७६ अर्ज आले आहेत. तर एएनएमसाठी एकूण ३० जागा आहेत.