मात्र फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि मार्चअखेर ती मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे १ एप्रिलपासून लालपरीची सेवा जवळपास पूर्णपणे ठप्प करण्यात आली. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर अशा काही लांबपल्ल्याच्या महत्त्वाच्या मोजक्याच गाड्या सोडल्या जात आहेत. तालुक्यांतर्गत व तालुकाबाह्य प्रवासी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गरजू प्रवाशांना तातडीचा प्रवास करता येत नाही. तर महामंडळालाही याचा मोठा फटका बसत असल्याने दररोज किमान ७ ते ८ लाख रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
परिवहनचे आर्थिक नियोजन पुन्हा कोलमडले
राज्य परिवहन महामंडळ गेल्या काही वर्षांपासून तोट्यात चालत आहे. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून शेकडो कोटींचा तोटा एस.टी. महामंडळाला सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यात तर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठीही महामंडळाकडे पैसे उपलब्ध नव्हते. राज्य सरकारने अनुदान दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात यश आले. त्यानंतर मागील चार महिन्यापासून एस.टीची सेवा पूर्वपदावर येत असताना आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नियोजन पुन्हा कोलमडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे तर गरजू प्रवाशांचे हाल होत आहेत.
कोट ::::::::::::::::::::::
सध्या पंढरपूर आगारातून काही महत्त्वाच्या गाड्या सोडल्या जात आहेत. एका गाडीत ३० प्रवाशांची भरती झाल्यावरच कोरोनाचे नियम पाळून बस सोडली जाते. ग्रामीण भागातील सर्व सेवा बंद केली आहे. त्यामुळे दररोज पंढरपूर आगाराला जवळपास ७ लाखांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागत आहे.
- एस. एस. सुतार
आगार प्रमुख, पंढरपूर