बार्शी: कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्याला बार्शी आगारही अपवाद ठरले नाही. कोरोनापूर्वी दिवसाला १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. लॉकडाऊन उघडताच एसटीची चाके पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. बार्शी आगाराचे पडझडीच्या काळात उत्पन्न चार लाखांवर आले आहे. हळूहळू लालपरीची चाके पूर्वपदावर येत आहेत.
बार्शी परिसरातील अनेक लोक ठाणे, मानपाडा, कासारवडवली, घोडबंदर, नवघर, सानवली, वसई भागात कामानिमित्त स्थयिक आहेत. त्यांना ठाण्याला उतरून रेल्वेने प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्या नागरिकांच्या सोयीसाठी बार्शी स्थानकातून दररोज सकाळी साडेआठ वाजता बार्शी-वसई ही बस गुरुवारपासून सुरू झाली आहे़. वसईहून सकाळी साडेसात वाजता ही बस निघते.
---
बार्शी बस स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक बसची सोडीयम हायपोक्लोराइ्ड औषधाने फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. कोरोनाबाबत प्रवाशांची काळजी घेतली जात आहे.
- मोहन वाकळे आगारप्रमुख वाकळे
----
बार्शी-पुण्यासाठी इलेक्ट्रिक बसची मागणी
बार्शी-पुणे या मार्गावर पूर्वी शिवशाही बसेच धावायच्या़. मात्र, आता या आगाराने शिवशाही नव्हे, तर ३ इलेक्ट्रिक बसची मागणी केली आहे. त्या मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये एसीची सोय आहे, तसेच मोबाइल चार्जिंंगची ही सोय
असणार आहे.
---
सीएनजी पंप आता कुर्डूवाडीत
बार्शी आगाराचे महत्व पाहून भाविष्यात बहुतांश बसेस या सीएनजी गॅसवर धावणार आहेत. त्या धर्तीवर बार्शीसाठी सीएनजी पंप मंजूर झाला आहे. महामंडळाच्या गाड्यांना भरून शिल्लक राहत असलेला गॅस खासगी वाहनांनाही दिला जाणार होता. मात्र, या पंपासाठी बार्शीत जागा उपलब्ध नसल्यामुळे हा पंप कुर्डूवाडीला हलविण्यात आल्याचे आगारप्रमुख मोहन वाकळे यांनी सांगितले.
---
मालवाहतुकीत सोलापूर प्रथम क्रमांकावर
बार्शी आगार हे तसे जिल्ह्यातील क्रमांक दोनचे आगार म्हणून ओळखले जाते. या डेपोकडे ७९ बसेस आहेत़ लाॅकडाऊन उठताच, मुंबई, बोरीवली, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, शेगाव, कोल्हापूर, पुणे या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या. बार्शी-सोलापूर या मार्गावर सध्या अर्ध्या तासाला अर्थात दिवसभरात ३६-३६ फे-या बसेस करत आहेत. पुणे मार्गावर ही सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दहा बसेस धावत आहेत.
माल वाहतुकीमध्ये सोलापूर विभाग राज्यात क्रमांक एकवर आहे. सोलापूर विभागात बार्शी आगार क्रमांक दोनवर आहे.