सोलापूर : जमिनीवरील बोजे कमी करण्यास सोसायटीकडून अडथळा येत आहे. त्यामुळे नव्याने कर्ज मिळत नाही. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असून, त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करायची आहे. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम मला मरणाची परवानगी द्या, अशी व्यथा बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील दिव्यांग शेतकरी सूर्यकांत चिकणे यांनी मांडली आहे.
सोमवारी सायंकाळी एका वाहनातून चिकणे हे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. दिव्यांग असल्याने ते खालीच थांबून होते. याची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी तत्काळ त्यांच्या वाहनाकडे येत त्यांची व्यथा ऐकून घेतली. याबाबत सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना पवार यांनी आवश्यक सूचना दिल्या. लवकरच याबाबत सुनावणी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दिव्यांग शेतकऱ्याची व्यथा ऐकून त्यांचे निवेदन स्वीकारून शमा पवार यांनी माणुसकी दाखवली आहे.
गुळपोळी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवांनी कर्जवाटपात व वसुलीत अफरातफर केली असून, सुमारे १२२ शेतकऱ्यांकडील कर्जाचे पैसे वसूल करून ते सोसायटी किंवा बँकेत न भरता त्याचा वापर स्वत:साठी केला. त्यानंतर शेतकऱ्यांना बेबाकीचे बोगस दाखले दिले. दुसरीकडे शासनाच्या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांची दिशाभूल करून अंगठे व सह्या घेतल्या आणि कर्जमाफीचा लाभ उठवला. अशाप्रकारे एकीकडे शेतकऱ्यांची आणि दुसरीकडे सरकारची फसवणूक सचिवांनी केली. याविषयीच्या तक्रारीनंतर एका सचिवावर निलंबनाची तर दुसऱ्या सचिवावर बडतर्फीची कारवाई झाली. यातील दोष बँक इन्स्पेक्टरवर गुन्हेही दाखल झाले. मात्र, शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील कर्जाचे बोजे काही कमी केले नाहीत.
---
आता अन्नत्याग
कर्जाचे बोजे कमी करण्यासाठी वारंवार सहकार विभागाकडे मागणी करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सध्या गुळपोळी येथील विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात धरणे आंदोलन सुरू असून, आता यापुढे अन्नत्याग करणार आहोत. मायबाप प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा. न्याय देणे जमत नसेल तर आत्महत्या करण्याची तरी परवानगी द्यावी, अशी संतप्त मागणी चिकणे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांच्याकडे केली.