सोलापूर : अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले़ याशिवाय प्रतिबंधित क्षेत्र कमी करून क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांवरून २८ दिवस करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज अक्कलकोट येथे दिले.
अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात कोरोनाविषयी आढावा बैठकीत शंभरकर बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अंजली मरोड, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेड, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी उपस्थित होते.
मरोड यांनी शहर व तालुक्यातील कोरोनाची स्थितीची माहिती दिली. शहरात सोलापूर आणि कर्नाटकमधून मालवाहतूक करणाºया गाड्यांमधून संसर्ग वाढत आहे. शहरात तीन प्रतिबंधित क्षेत्र असून शहर व तालुक्यात वीस जणांना बाधा झाली आहे. यातील चौघे मरण पावले असून सात रूग्ण बरे झाले तर नऊ रूग्णांवर उपचार सुरू आहे.
शंभरकर म्हणाले, पावसाळ्यात रूग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता अधिक लक्ष द्या. रूग्ण संसर्ग आणि मृत्यूदर कमी करण्यावर अधिक भर द्या. प्रत्येक रूग्णांचा पाठपुरावा करा. वृद्ध, लहान बालके यांच्यावर जास्त फोकस करा. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही बसवा. बाहेरच्या प्रवाशांवर आणि कंटेनमेंटमध्ये पोलिसांनी अधिक लक्ष द्या, विना मास्क असेल तर दंडाशिवाय संस्थात्मक विलगीकरण करा.
शहरात परवापासून तत्काळ सर्व्हे सुरू करा, यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, दमा, कॅन्सर, गरोदर महिला, बालके अशा पद्धतीने करा. हा सर्व्हे एक दिवसाआड करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना दिल्या. संशयित रूग्ण वाटल्यास त्याला त्वरित रूग्णवाहिकेतून दवाखान्यात पाठवा. रूग्णांच्या संपकार्तील सर्व व्यक्तींचे स्वॅब घेण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. यावेळी प्रांताधिकारी पाटील यांनीही कोरोनाविषयी जागृतीबाबत सूचना केल्या.