सोलापूर : खासगी प्रयोगशाळेतून करण्यात येणाºया कोरोना चाचणीच्या दरामध्ये ३०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून अद्याप अधिकृत आदेश आला नसला तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये चाचणीसाठी पूर्वीपेक्षा ३०० रुपये कमी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या नियमामध्ये बदल करण्यात आल्याने चाचण्यांसाठी लागणारे साहित्य तुलनेने पुरेसे आणि स्वस्त मिळत आहे. तसेच पीपीई किटच्या वाढत्या उत्पादनामुळे त्याचा दरदेखील कमी झाला आहे. त्यामुळे तपासणी खर्चात कपात करता येणे शक्य झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पुण्यातील दोन प्रयोगशाळा या स्वॅबची चाचणी करून देतात. या प्रयोगशाळेतून सोलापुरात स्वॅबची चाचणी होत नाही. या खासगी प्रयोगशाळा रुग्णालयाच्या माध्यमातून स्वॅब घेऊन पुण्याला तपासणीसाठी नेतात. त्याचा अहवाल रुग्णालयांना पाठवला जातो. या दोन्ही कंपन्यांनाही आता सुधारित दर आकारावे लागणार आहेत.
स्वॅब आकारणी..नव्या नियमानुसार स्वॅब घेऊन त्याची वाहतूक, स्वॅबचा अहवाल देण्यासाठी २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये आकारण्यात येणार आहेत. कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० ऐवजी २,५०० रुपये आकारण्यात येणार आहेत.