सोलापूर : मागील दीड वर्षापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत म्हणून नागरिकांनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक, सीएनजी, एलपीजी गाड्यांचा वापर वाढल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत घट झाली आहे. महामार्गावरील पंपांवर ८० टक्के, तर शहरात १० टक्के परिणाम झाला असल्याचे सोलापूरपेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनतर्फे सांगण्यात आलेले आहे.
सततच्या वाढत्या इंधन दरवाढीमुळे नागरिक पर्यायी व्यवस्था म्हणून चारचाकी वापरण्याऐवजी सध्या दुचाकींचा वापर करत आहेत. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. गेल्या महिन्याच्या शेवटपर्यंत शहरांमध्ये ७४२ पेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत, त्यामुळे आणि इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसांत अनेक राज्यातील इंधनाचे दर कमी केले आहेत, त्यामुळे महामार्गावरील पंपांवर येणारी जड वाहतूकदारांनी शेजारच्या कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथून इंधन भरल्यामुळे त्यांनी किमान ९ ते १५ रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे महामार्गावरील पंपांवर पेट्रोल-डिझल विक्रीत ८० टक्के घट झालेली आहे.
शहर व परिसरातील पंप
- पेट्रोल पंप- ३००
- एलपीजी पंप- ०२
- सीएनजी पंप-०१
इंधनाच्या किमती
- पेट्रोल - ११०.३३
- डिझेल - ९३.१२
- एलपीजी- ३८. २६
- सीएनजी-
---
शहारत ७४२ इलेक्ट्रिक वाहने
दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणावर चांगला उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापराकडे शहरातील नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. या वाहनांच्या खरेदीवर जीएसटी, नोंदणी तसेच अन्य चार्जेसमध्ये सूट देण्यासह सरकार वाहन खरेदीकरिता अनुदानदेखील देत आहे. त्यामुळे शहरात ६ चारचाकी, ७०५ दुचाकी आणि ३१ ई-रिक्षा अशी एकूण २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत शहरात ७४२ इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत.
----
रिक्षामध्ये एलपीजी, कारमध्ये सीएनजी
पेट्रोल, डिझेलवर होणाऱ्या खर्चात एकदम वाढ झाली आहे. गेल्या दहा- बारा वर्षांमध्ये सीएनजीचा परवडणारा पर्याय पुढे आला आहे. रिक्षामध्ये एलपीजी, कारमध्ये सीएनजी सीएनजी किट बसवून घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
---
डिझेल, पेट्रोल विक्रीवर परिणाम
शहरात ३० आणि जिल्हाभरात ३०० पंप आहेत. शहरातील डिझेल,पेट्रोल विक्रीवर काही परिणाम झालेला नाही मात्र, महामार्गावरील पंपांवर ८० टक्के परिणाम झालेला आहे. - महेंद्र लोकरे, सचिव, सोलापूर पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशन
शहरात अनेक जणांनी वाहन वापरच कमी केला, त्यामुळे आणि इंधन दरवाढने पेट्रोल-डिझल विक्रीत अगदी कमी घट आहे. मात्र, महामार्गावरील सीमेलगत असलेल्या पंपावर अधिक परिणाम झालेला आहे.
- प्रकाश हत्ती, उपाध्यक्ष सोलापूर पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशन
---