माळशिरस तालुक्यातील अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर या प्रमुख गावाबरोबर छोट्या गावातही सोईसुविधा व आकर्षक आधुनिक स्थापत्य शैलीतील इमारती शहरांची आठवण करून देत आहेत.
मूलभूत गरजांपैकी एक गरज म्हणजे निवारा. मात्र गरजेनुसार झालेले बदल व विविध कालखंडातील स्थापत्याचा प्रभाव त्या परिसरातील बांधकामांच्या जडणघडणीतून समोर येतो. आदिमानवाच्या गुहा, राजवाडा, महाल, बंगला, फार्म हाऊस, रो हाऊस, अलिशान इमारती असा प्रवास आढळतो.
जुन्या व नव्या स्थापत्याची सांगड,
बांधकामाची स्टाईल
भारतात स्थापत्यकलेचा उगम हडप्पा काळापासून असल्याचे मानले जाते. मात्र आपल्याकडे शहर व गावांमधील बांधकाम क्षेत्रातील दरी झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात औद्योगिक व्यापारी व राहण्यासाठी होत असलेल्या नवीन बांधकामातून आधुनिक स्थापत्य शैलीचा प्रभाव दर्शविण्याचा प्रयत्न आवर्जून केलेला दिसतो.
लोखंड, खडी, वाळू, सिमेंट, विटा, टाईल्स यांच्या घनतेनुसार वजन गृहीत धरून वेगवेगळ्या इमारतींचा आराखडा तयार केला जातो. यामध्ये आधुनिक पद्धतीने विविध प्रकारच्या डिझाइन्स असणाऱ्या इमारतीमुळे बांधकामाची विशिष्ट स्टाईल पाहायला मिळत आहे.
वास्तुशास्त्राचा प्रभाव
ग्रामीण भागातील बांधकामात बंगलो पद्धती वेगाने विकसित होत आहे. या वास्तूरचनेवर शहरी व पाश्चात्त्य देशातील वास्तुशैलीबरोबरच वास्तुशास्त्राचा प्रभाव दिसतो. यामध्ये आतील फर्निचर, काचा, खिडक्या, छप्पराचे आकार व वेगवेगळ्या डिझाइन्स दिसतात, तर बहुतांश इमारतींना वास्तुशास्त्राचा आधार घेतलेला दृष्टीस पडतो.
फार्महाऊस पद्धतीत होतेय झपाट्याने वाढ
माळशिरस तालुक्याच्या ग्रामीण भागातून व्यापार अथवा नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने शहरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांनी यापूर्वी स्वतःच्या शेतात असणाऱ्या गोठ्याच्या आसपास टुमदार जांभ्या दगड, विशिष्ट प्रकारची वीट व रंगीबेरंगी पत्रा अथवा कॉक्रीटच्या मदतीने बनवलेले घर त्यामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा व आसपासच्या परिसरात वैविध्यपूर्ण झाडांच्या लागवडीमुळे ग्रामीण भागात फार्महाउस पद्धती झपाट्याने पुढे येत आहेत.