भ. के. गव्हाणे बार्शी दि ७ : राज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केली. त्यानंतर जागांची पाहणी केली. तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाई होत आहे. नव्याने होत असलेले पोलीस ठाणे हे कागदावरच राहिले आहे. पोलीस ठाणे केव्हा सुरू होणार? असा सवाल बार्शी शहर आणि तालुक्यामधील नागरिक करीत आहेत. ५९ गावांसाठी शहरात स्वतंत्र तालुका पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी ३० जून २०१७ मध्ये सुधारित अधिसूचना काढण्यात येऊनही ते अद्यापही सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. सुधारित अधिसूचना गृह विभागाने निघाल्यानंतर ती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांनी १३ सप्टेंबर २०१७ मध्ये बार्शीत येऊन विभागीय पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक संदीप मिटके, तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले, अधिकारी यांच्यासमवेत कासारवाडी रोडवरील हागरे प्लॉट, नगरपालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर व जुनी पोलीस चौकी या जागांची पाहणी केली होती. त्यास जवळजवळ तीन महिने होत आले तरी अद्याप जागा निश्चित करण्यात आली नाही. पूर्वी मंजुरी मिळालेले तालुका पोलीस स्टेशन सुरू होण्याच्या अधिसूचनेतील ५९ गावांशिवाय कार्यरत असलेल्या शहर पोलीस ठाणे हद्दीतील तुळशीराम पोलीस चौकी, सुभाष नगर चौकी व शिवाजी नगर पोलीस चौकी या तिन्ही चौकींचा फेरबदल व दुरुस्तीचा प्रस्ताव गृह विभागाकडे सुधारित आदेशासाठी गेला होता. त्यास ३० जून २०१७ रोजी सुधारित अधिसूचना प्राप्त होऊनही आज तीन महिने झाले आहेत. ---------------------------तर लोकांची सोय होईल...च्सध्या आगळगाव व खांडवी या दूरक्षेत्रातील गावच्या लोकांना सोयीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेसाठी तसेच मोटर अपघातात तातडीने मदत मिळण्यासाठी विविध गुन्ह्यांबरोबरच राजकीय गुन्हेगारी यावर लक्ष ठेवण्यासाठी वैराग व पांगरी पोलीस स्टेशनला जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या वेळेबरोबरच आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. शिवाय बार्शी-कुर्डूवाडी राज्यमहामार्ग आहे. या रस्त्यावरही दुर्घटना घडली तर तातडीने दखल घेण्यासाठी शिवाय जखमींना शहरातील दवाखान्यात दाखल करावे लागते. परंतु वैराग व पांगरी पोलीस स्टेशन लांब असल्याने पोलिसांची मदत मिळण्यास विलंब होतो. नवीन तालुका पोलीस स्टेशन सुरू झाल्यानंतर सोयीचे होणार आहे.
अधिसूचनेत दुरुस्ती होऊनही बार्शी तालुका पोलीस ठाणे अद्याप कागदावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 11:23 AM
राज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केली. त्यानंतर जागांची पाहणी केली. तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाई होत आहे.
ठळक मुद्दे जागांची पाहणी केली तरीही बार्शी तालुका पोलीस ठाणे सुरू होण्यास दिरंगाईराज्य शासनाच्या गृह खात्याने अधिसूचनेत दुरुस्ती केलीनव्याने होत असलेले पोलीस ठाणे हे कागदावरच राहिले