सोलापूर : सोलापूर येथे नव्याने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यातील या आठव्या प्रादेशिक कार्यालयाला शेजारचा उस्मानाबाद जिल्हा जोडला आहे.
राज्यात सध्या सात प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालये आहेत. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती व नागपूर या ठिकाणी प्रादेशिक सहसंचालक कार्यालये आहेत. सोलापूर जिल्ह्याचे कामकाज सध्या पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयातून तर उस्मानाबाद जिल्ह्याचे कामकाज नांदेड प्रादेशिक कार्यालयातून चालते. या दोन्ही जिल्ह्यांसाठी नव्याने सोलापूर येथे प्रादेशिक सहसंचालक कार्यालय मंजूर झाले आहे. जानेवारी महिन्यात या कार्यालयाची सुरुवात होण्याची शक्यता मंत्रालय व साखर आयुक्त कार्यालय पुणे येथून वर्तविण्यात आली.
५५ साखर कारखान्यांसाठी कार्यालयसोलापूर जिल्ह्यात सध्या ३९ साखर कारखाने असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांची संख्या १६ इतकी आहे. दोन्ही जिल्ह्यांतील ५५ साखर कारखान्यांचा कारभार सोलापूर शहरातील कार्यालयातून चालणार आहे. या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयामुळे सोलापूरमध्ये एका नव्या प्रादेशिक कार्यालयाची भर पडली आहे.
सध्या विभागातील कारखाने संख्या व समाविष्ट जिल्हे
- - कोल्हापूर विभाग - ४१ (कोल्हापूर, सांगली),
- - पुणे विभाग - ७२ (सोलापूर, सातारा, पुणे)
- - अहमदनगर - ३२ (अहमदनगर, नाशिक),
- - औरंगाबाद - ३७ (धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड)
- - नांदेड विभाग - ४८ (परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर)
- - अमरावती विभाग - ८ (बुलडाणा, अमरावती, यवतमाळ)
- - नागपूर - ६ (वर्धा, नागपूर, भंडारा)
कारखान्यासोबत शेतकºयांचीही सोय- सध्या सोलापूरकरांना (कारखाने व शेतकरी) पुणे प्रादेशिक कार्यालयाला २५० किलोमीटर अंतरावर जावे लागते. सोलापुरात कार्यालय झाल्याने कारखान्यासोबत शेतकरी व संघटनांच्या पदाधिकाºयांना सहज संपर्क करता येईल. उस्मानाबादकरांना नांदेड प्रादेशिक कार्यालयाला जाण्यासाठी २३० किलोमीटरवर जावे लागते. सोलापूरच्या प्रादेशिक कार्यालयामुळे अवघा ६२ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.