सोलापूर : कोविडकाळात अनेकांचा रोजगार गेला. अनेकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांत नोकरीसाठी शासनाच्या रोजगार विषयक वेब पोर्टलवर तब्बल २१ हजार ६०० युवक व युवतींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी फक्त साडेसातशे लोकांनाच नोकरी मिळाली. त्यामुळे उर्वरित युवक व युवती कोणी नोकरी देता का नोकरी?, अशी मागणी करताहेत.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे जवळपास तीन हजार २९५ उद्योजकांनी नोंदणी केली आहे. त्यांच्याकडे नोकरीची मागणी निर्माण झाल्यावर ते रोजगार केंद्राला कळवतात. त्यानंतर अनेक कंपन्यांच्या सहयोगातून रोजगार मिळावे भरवितात. रोजगार मेळाव्याला युवकांची प्रचंड गर्दी असते.
रोजगार केंद्राकडून सेवा सोसायट्यांना प्रति सदस्य दरवर्षी १२०० रुपये तसेच किमान ११ सदस्यांच्या सेवा संस्थेस वार्षिक १३ हजार २०० प्रमाणे तीन वर्षांकरिता व्यवस्थापकीय अनुदान दिले जाते.
.............
२०२१ मधील रोजगार नोंदणीची माहिती
मार्च
पुरुष-९१३
स्त्री-२८५
..........
एप्रिल
पुरुष-३९४
स्त्री-४०
.......
मे
पुरुष-३७३
स्त्री-६१
......
जून
पुरुष-२८९
स्त्री-१४०
.........
जुलै
पुरुष-११०७
स्त्री-४००
शिक्षित व अल्पशिक्षित युवक-युवतींना रोजगार प्राप्ती तसेच स्वयंरोजगार करिता मार्गदर्शन साहाय्य करून त्यांचे राहणीमान उंचावण्याचे काम आम्ही करतो. यास युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. विविध कंपन्या, उद्योग यांच्या समन्वयाने रोजगार मेळावे घेतो. जास्तीत जास्त युवकांना नोकरी मिळावी, याच दृष्टिकोनातून आम्ही कोविडकाळातही ऑनलाइन रोजगार मेळावे भरविले.
-सचिन जाधव, सहायक आयुक्त-कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर
चालू वर्षात ७१ युवकांना नोकरी
२०१९- २० साली ३ रोजगार मेळावे झालेत. यात ३१ उद्योगांचा सहभाग होता. एकूण ४०४ युवकांना रोजगार मिळाला. २०२०-२१ साली तीन रोजगार मेळावे झालेत. यात २८ उद्योगांचा समावेश होता. यावर्षी २९५ युवकांना रोजगार मिळाला. चालू वर्षात दोन रोजगार मेळावे झाले. त्यात १३ उद्योगांचा सहभाग होता. फक्त ७१ युवकांना रोजगार मिळाला.
परगावी जाण्याचे प्रमाण अधिक
सोलापुरात उद्योगाभिमुख वातावरण नसल्याने मोठ्या कंपन्या सोलापुरात येत नाहीत. त्यामुळे सुशिक्षित व उच्च शिक्षित युवकांना सोलापुरात रोजगार मिळत नाही. रोजगाराच्या प्रतीक्षेत उच्चशिक्षित युवक मुंबई-पुणे तसेच हैदराबादकडे मोठ्या संख्येने जातायत. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा अद्याप कायम आहे.