वैराग: नात्यातील मुलीच्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरून सख्ख्या मामानेच भाच्याला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली.
याप्रकरणी वैराग पोलिसात दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवार, दि. १७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान बार्शी तालुक्यातील पिंपरी (पा) शिवारात घडली. समाधान देविदास जाधव (वय २५, रा. गुंजेवाडी, ता. जि. उस्मानाबाद) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंजेवाडी येथील समाधान देविदास जाधव हा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. बुधवारी वैरागचा बाजार असल्याने तो आपल्या मित्रासोबत वैराग येथे आला होता. त्यानंतर परत ते दोघे आपल्या गावाकडे मोटरसायकलवरून पिंपरी (पा) हिंगणीमार्गे उस्मानाबादकडे निघाले होते. त्यावेळी पिंपरी (पा) पाटीपासून मयताचा मामा कृष्णा राजाराम दार्इंगडे व मुलगा अनिकेत कृष्णा दार्इंगडे या दोघांनी त्यांचा मोटारसायकलवरून पाठलाग करण्यास सुरुवात केली. मयत समाधान याची मोटरसायकल शेतातील कच्च्या रस्त्यावर अडवली. त्याच्या अमोल धंगेकर या मित्राला पाय मोडून हातात देण्याची धमकी देऊन त्यास हाकलून दिले. मामा दाईंगडे याने समाधान यास जबर मारहाण करून मोटरसायकलवरुन जबरदस्तीने पळवून नेले व इसाक पठाण यांच्या वीटभट्टीजवळ टाकून दिले.
या मारहाणीत समाधानचा मृत्यू झाला. त्याच अवस्थेत त्याला सोडून ते निघून गेले. दरम्यान, मित्र अमोल धंगेकर याने गावी जाऊन ही घटना मयत समाधान याच्या वडिलांना सांगितली.
मयत समाधान व नात्यातील मुलीचे प्रेम प्रकरण होते. त्यामुळे त्याचा मामा कृष्णा दार्इंगडे हा समाधानवर चिडून होता. मामाचा या प्रकरणाचा राग मनात धरून समाधानला ठार मारल्याची फिर्याद मयताचे वडील देविदास दामू जाधव यांनी वैराग पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे करीत आहेत.