२७ जानेवारी रोजी नाईक हॉस्पिटलमध्ये पायल अनिल मगर (वय १९) या महिलेची प्रसूतीनंतर तब्येत अचानक बिघडल्याने अकलूज येथे उपचाराला नेताना निधन झाले होते. या मृत्यूस डॉ. नाईक दाम्पत्य जबाबदार आहेत, असे मनात धरून नातेवाइकांनी डाॅ. उमेश नाईक व शुभांगी नाईक यांना शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. रुग्ण मयत झाल्याच्या घटनेपासून वेळापूर पोलीस दवाखान्यात सुरक्षा पुरवत होते.
रविवारी अचानक दुपारी सव्वादोनच्या सुमारास मृत महिलेच्या उघडेवाडी (ता. माळशिरस) येथील माहेरच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून हातातील दगड, काठ्यांनी हॉस्पिटलच्या काचा, दरवाजे, खुर्च्या, टेबल, मशीन, बाकडे, फर्निचर, आदींची मोडतोड व नासधूस केली होती. तसेच डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी देऊन हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डॉक्टरांच्या घरामध्ये घुसून बेडरूमच्या ड्रॉवरमधील ३५ हजार रुपये आणि सोन्याची चेन असा ऐवज पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर दाखल फिर्यादीनुसार रोहित अशोक थोरात, राहुल विजय थोरात, अशोक रामचंद्र थोरात आणि प्रशांत कृष्ण सावंत (रा. उघडेवाडी, ता. माळशिरस) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.