सोलापूर : गुंतवणूक म्हणून अनेकजण प्लॉट खरेदी करतात. बरीच वर्षे त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करीत नाहीत. बहुतेकजण तर सभोवताल संरक्षण भिंतीचेही बांधकाम करीत नाहीत. तसेच परगावी राहत असल्याने त्या प्लॉटकडे जातही नाहीत. याचाच फायदा घेत काही व्यक्ती त्यावर अतिक्रमण करीत असल्याचे प्रमाण वाढले आहे.
एनए असलेला प्लॉट असल्यास त्यासंदर्भात कारवाई करून न्याय मिळण्याची शक्यता असते. मात्र, अनधिकृतरीत्या लेआऊट पाडले असल्यास त्यातून न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे प्लॉट खरेदी केल्यानंतर मालकांनी विशेष काळजी बाळगणे गरजेचे आहे. शहरातील हद्दवाढ भागामध्ये असे प्रकार जास्त प्रमाणात घडतात.
एकच प्लॉट अनेकांना विकला
शहरातील काही भागात एकच प्लॉट एकापेक्षा अधिक लोकांना विकल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी प्लॉट खरेदी करताना मूळ मालकांकडील कागदपत्रे तपासून संबंधित कार्यालयातून त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. नाहीतर फसवणुकीला आपणसुद्धा बळी पडू शकतो.
प्लॉट असल्यास ही घ्या काळजी
प्लॉटची खरेदी झाल्यानंतर तत्काळ त्यास सिमेंटचे खांब रोवून तारांचे कुंपण करून घ्यावे किंवा सुरक्षा भिंतीचे बांधकाम करावे. प्लॉट खरेदी केल्यानंतर लगेच त्याची नोंदणी करावी. तसेच प्लॉटच्या चारही बाजूंनी ठळक अक्षरात मूळ मालकाचे नाव आणि प्लॉटवर कुणीही अतिक्रमण करू नये, असा मजकूर नमूद असलेला फलक लावल्यास चुकीच्या प्रकारांना बहुतांशी आळा बसू शकतो. प्लॉट मालक दुसऱ्या ठिकाणी राहत असल्यास अधून-मधून प्लॉटची पाहणी करावी.
----------
प्लॉट हडपल्याच्या तक्रारी
- २०१९ - २४
- २०२० - २७
- २०२१ (मे पर्यंत) - १६
हद्दवाढ भागामध्ये प्लॉट खरेदी करून त्याकडे वर्षानुवर्षे लक्ष दिले जात नाही. संबंधित प्लॉट मालकांनी महिन्यातून दोन वेळा जाऊन प्लॉटची पाहणी करावी. शक्य झाल्यास त्याठिकाणी बोर्ड लावावा. आपली फसवणूक होऊ नये, याची काळजी घ्यावी.
- बापू बांगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे)
व्यवहार करताना संबंधित जागेचा तपशील तपासून पाहावा. त्यानंतर व्यवहार करावा. फसवणुकीचा प्रकार घडत असल्यास संबंधितांनी आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही तत्काळ त्या विरोधात कारवाई करू.
- हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी