सोलापूर : शिवाजीनगर येथे कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या पाडसाची सुटकी करण्यात आली. जखमी पाडसावर प्रथमोपचार करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणयात आले. वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशन (डब्लूसीए) व वन विभाग यांनी हे बचाव कार्य करण्यात आले.
गुरुवार तीन जून रोजी दुपारी शिवाजीनगर, खेड कॅनल येथील शेतकरी रामेश्वर सुरवसे यांच्या शेताजवळ सकाळी हरणांचे कळप चरण्यासाठी आले होते. त्या हरणाच्या कळपावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. हल्ला झाल्याच्या भीतीने हरणाच्या कळपाने धूम ठोकली; परंतु या घाईगर्दीत त्या हरणाच्या कळपातील एक हरणाचे नवजात पिल्लू कुत्र्यांच्या तावडीत सापडले आणि जिवाच्या आकांताने सुरवसे यांच्या शेतात घुसले. कुत्री त्याच्यावर हल्ला करत असताना शेतकरी प्रशांत पैकेकरी, संदीप पैकेकरी आणि नवनाथ सुरवसे यांनी त्या मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावून त्या पाडसाला त्यांच्या तावडीतून सोडविले.
या घटनेची माहिती डब्ल्यूसीएचे संतोष धाकपाडे व सुरेश क्षीरसागर व वनरक्षक आदलिंगे यांना देण्यात आली. काही वेळातच वनमजूर दशरथ कांबळे यांना घटनास्थळी आले. भेदरलेल्या हरणाच्या पाडसावर प्रथमोपचार करून लगेच जवळच असलेल्या त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये पुन्हा सोडून देण्यात आले. या बचाव कार्यामध्ये अजित चौहान, सोमानंद डोके यांनी सहभाग घेतला.