शितलकुमार कांबळे, पंढरपूर : सध्या जिल्यातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती आ. यशवंत माने यांनी दिली.
पंढरपूर येथे आ. यशवंत माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जितेंद्र साठे, हरिभाऊ घडागे, हनुमंत पवार उपस्थित होते. पुढे आ. माने म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेली ऊसासह केळी, डाळिंब, तूर, बाजरी, मका अशी विविध पिके जळू लागली आहेत.
पंढरपूर तालुक्याला व सांगोला शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या भीमा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यातील पाणी साठा संपला आहे. मोजकेच दिवस पाणी पुरेल एवढं पाणी शिल्लक आहे. लवकरच पाणी सोडले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, तसेच पिके वाचतील अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील ४० साखर कारखाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. पिके वाचवण्यासाठी उजनी धरणातून उजवा आणि डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे. अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून केली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थिती विषयी चर्चा केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.