सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या आहेत. परंतु मंगळवेढा तालुक्यात पावसाने सध्या दडी मारल्याने पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. कृष्णा खोऱ्यात झालेल्या पावसाचे पाणी कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. ते पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वितरिकेद्वारे मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागामध्ये सोडल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळेल.
या योजनेमध्ये समावेश असलेल्या सर्व गावांतील ओढ्यावरील सर्व बंधारे व शिरनांदगी, मारोळी, लवंगी, पडोळकरवाडी साठवण तलाव पाण्याने भरून घेतल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळेल. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु., सलगर खु, आसबेवाडी, येळगी, शिवणगी, सोड्डी या गावांना बंदिस्त नलिकेद्वारे म्हैसाळ योजनेचे पाणी देण्यासाठीची चाचणी घेतली आहे. सध्या पाणी सोडण्यास कोणतीही अडचण राहिली नाही. तरी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या वितरिकेद्वारे व बंदिस्त नलिकेद्वारे शेतीसाठी पाणी सोडावे, असे निवेदनात नमूद केले आहे.