माळशिरस : तालुक्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गेल्या चार वर्षांत दरवर्षी ठराविक घरकुलांचा कोटा पूर्ण केला जात असतानाच यावेळी ‘ब’ परिपत्रकानुसार १०० टक्के लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे २०१६ पासून पूर्ण झालेल्या, काम सुरू असलेल्या, सध्या नव्याने मंजुरी मिळालेल्या अशा ८ हजार ३६ घरकूल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
नव्याने मंजूर झालेल्या घरकूल लाभार्थ्यांना सूचनापत्र वितरित केली जाणार आहेत. याबाबतची बैठक पंचायत समितीत पार पडली. यावेळी सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी उपसभापती किशोर सुळ, गटनेते प्रतापराव पाटील, रेणुका माने-देशमुख, लतिका कोळेकर, हेमलता चांडोले, ॲड. हसिना शेख, ताई महाडिक, मानसिंग मोहिते, नानासाहेब नाईकनवरे, गजानन ऐकतपुरे, हणुमंत पाटील, विकास कोळेकर, शहाजी महाडिक, ओंकार माने-देशमुख, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
‘ब’ पत्रकानुसार १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण
२०१६ पासून ४ हजार २४७ घरकुले मंजूर झाली होती. यातील ३१७२ घरे पूर्ण झाली, तर ७३६ घरांची कामे सुरू आहेत. सध्या ‘ब’ पत्रकानुसार उर्वरित १०० टक्के म्हणजेच ३ हजार ७८९ नवीन उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या नव्या टप्प्यात ४५ कोटी ४६ लाख ८० हजार रुपये तर रोजगार हमी योजनेतून ६८ लाख रुपये निधी माळशिरस तालुक्यातील लाभार्थ्यांना मिळणार आहे.
---केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रथमच मोठ्या प्रमाणात घरकूल लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होईल. याबरोबरच राज्य सरकारने रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा.
- अर्जुनसिंह मोहिते-पाटील, उपसभापती, माळशिरस पंचायत समिती