सांगोला तालुक्यात चालू वर्षी मान्सूनपूर्व पावसाचे वेळेवर आगमन झाले. रोहिणी व मृग नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी १५ जूनपूर्वीच खरीप बाजरी, मका, तूर, आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली. कृषी विभागाने मात्र सरासरी १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन केले होते. तरीही शेतकऱ्यांनी झालेल्या पावसाच्या ओलीवर पेरण्या उरकून घेण्यास सुरुवात केली होती. मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या. त्यातच आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा चाड्यावर मूठ धरली.
आर्द्रा नक्षत्र संपताच पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पुन्हा पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीप बाजरी १० हजार ८११ हेक्टर, मका ४ हजार ४९५ हेक्टर, तूर ५५४ हेक्टर, उडीद ३९५ हेक्टर, मूग १७१ हेक्टर, भुईमूग १४८ हेक्टर, सूर्यफूल १ हजार ०२ हेक्टर अशा सुमारे १६ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पेरणी झालेल्या पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिके कोमजून जातील व दुबार पेरणीचे संकट ओढविले जाईल या भीतीने शेतकरी चिंतातुर झाला होता, तर पाऊस लांबल्यामुळे शहर व तालुक्यातील कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची वर्दळ कमी झाल्याने दुकानदारही धास्तावले होते.
अद्याप १६ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित
सांगोला तालुक्यात पुनर्वसू नक्षत्रातील सलग तीन दिवस झाले कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे आजपर्यंत पेरण्या झालेल्या खरीप बाजरी, मका, तूर, उडीद, भुईमूग, सूर्यफूल पिकांना दिलासा मिळाला आहे. खोळंबलेल्या पेरणीसाठी हा पाऊस दिलासादायक मानला जात आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार तालुक्यात अद्याप १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप बाजरी, मका, आदी पिकांच्या पेरण्या अपेक्षित आहेत. पाऊस असाच पडत गेल्यास वेळेवर पेरण्या पूर्ण होतील, असे प्रभारी तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे यांनी सांगितले.