सोलापूर - आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना खासगी शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो. ही प्रक्रिया सुरु असून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे प्रवेशाची अंतिम मुदत 15 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त पाठविण्यात येत आहेत. राज्यात 8823 शाळा या आरटीईतून प्रवेश देत असून 1 लाख 1 हजार 846 जागा या शाळात आहेत. एकूण 3 लाख 64 हजार 413 अर्ज दाखल झाले आहेत. 94 हजार 700 मुलांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली आहे. तर 51 हजार 63 मुलांना प्रवेश मिळाला आहे.
यंदाच्या वर्षी आरटीईसाठी सोलापूर जिल्ह्यातून २९५ शाळांनी नोंदणी केली असून २३२० जागांवर मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातून ७,७३८ पालकांनी आपल्या मुलांसाठी अर्ज सादर केला आहे. त्यापैकी २ हजार १६० मुलांची निवड झाली असून, आत्तापर्यंत 1111 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 1049 विद्यार्थी प्रवेश घेणे बाकी आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता दिलासा मिळाला आहे. निवड झालेल्या यादीमध्ये नाव असलेल्या बालकांच्या कागदपत्रांची तपासणी पडताळणी समितीकडे करण्याची मुदत 15 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.