आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून धावणारी म्हैसूर - सोलापूर एक्स्प्रेसचे डबे वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार १० मार्च २०२३पासून या गाडीचे स्लीपर क्लासचे डबे कमी करून दोन तृतीय श्रेणीचे डबे वाढविण्यात येणार आहेत.
सोलापूरहून धावणाऱ्या म्हैसूर एक्स्प्रेसला नियमित प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक्स्प्रेस अत्यंत सोयीचे ठरत आहे. प्रवाशांची गर्दी व मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने तृतीय श्रेणीचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी या गाडीला जनरेटर १, एसी १ टियर १, एसी ३ टियर ३, स्लीपर १२, जनरल ३, गार्ड ब्रेकयान १ असे २१ डबे होते. आता नव्या निर्णयानुसार या गाडीला जनरेटर १, एसी १ टियर १, एसी २ टियर १, एसी ३ टियर ४, स्लीपर १०, जनरल ३, गार्ड ब्रेकयान १ असे एकूण २१ डबे असणार आहेत.
या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा प्रवास वाढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही एक्स्प्रेस सुरू आहे. पर्यटन, शिक्षण व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी शेकडो लोक या गाडीने प्रवास करतात. दरम्यान, यामुळे कर्नाटक व महाराष्ट्रातील प्रवास आणखीन सुखकर व सोयीचा होणार आहे. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक रणनवरे यांनी केले आहे.